वनविभाग झोपेत?
काळी (दौ.) परिक्षेत्रात खळबळ
यवतमाळ जिल्ह्यातील काळी (दौ.) वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोखरी घाट परिसरात पुन्हा एकदा निलगायीची निर्घृण शिकार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात शिकाऱ्यांनी सापळा लावून निलगाय (रोही) पकडली आणि धारदार शस्त्रांनी तिची हत्या करून अवयव कापून नेल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मंगळवारी सकाळी स्थानिक नागरिकांना पोखरी शिवारातील घाट परिसरात निलगायीचा मृतदेह अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची पाहणी केली असता हा प्रकार वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा नसून काही व्यक्तींनी केलेल्या शिकारीचा कट असल्याचे स्पष्ट होत आहे. शिकाऱ्यांनी निलगायीचे पाय, पोटातील अवयव आणि मोठ्या प्रमाणात मांस कापून नेल्याचे दिसून आले. या गंभीर घटनेबाबत काळी (दौ.) वनपरिक्षेत्राचे रेंजर सम्राट मेश्राम यांना दूरध्वनीवरून विचारणा केली असता त्यांनी या प्रकरणाची माहिती नसल्याचे सांगत जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला त्यामुळे वनविभागाची गस्त व्यवस्था आणि देखरेख यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, याच वनपरिक्षेत्रात १६ एप्रिल २०२४ रोजी तीन निलगायांची शिकार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला होता. त्या वेळीही वनविभागाची यंत्रणा निष्क्रिय ठरल्याने अखेर स्थानिक गुन्हे शाखेला हस्तक्षेप करावा लागला होता. त्या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली होती, तर दोन आरोपी फरार झाले होते.
दरम्यान, पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना घडल्याने वनविभागाच्या निष्काळजीपणावर तीव्र टीका होत आहे. परिसरातील वन्यजीव संरक्षणासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांनी योग्य वेळी कारवाई न केल्यास शिकाऱ्यांचे धाडस वाढत असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर निलगायीच्या शिकारीच्या ताज्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, तसेच काळी (दौ.) वनविभागातील बेजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि वन्यजीव प्रेमींनी केली आहे.

