लोकचिंतन
ताज्या घडामोडी

महागाव पोलिसांचा विद्यार्थी सुरक्षा व पोलीस भरती मार्गदर्शनाचा दुहेरी उपक्रम

 महागाव पोलीस स्टेशनच्या वतीने आज शुक्रवारी (दि. १७) विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह युवकांना पोलीस भरतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय वाहनचालकांची सभा घेण्यात आली, तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना पोलीस भरतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. दुपारी १२ वाजता महागाव पोलीस स्टेशन येथे परिसरातील शासकीय व खासगी शाळांच्या वाहनचालकांची सभा आयोजित करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनचालकांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. वाहन चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे, वाहनाचा वेग मर्यादित ठेवणे, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहून न नेणे, वाहनांची नियमित तांत्रिक तपासणी करणे, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर टाळणे तसेच वाहनाचे परवाना, विमा, पीयूसी आणि इतर आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांच्या जीविताची सुरक्षितता ही सर्वोच्च जबाबदारी मानून प्रत्येक वाहनचालकाने जबाबदारीची जाणीव ठेवून वाहन चालवावे, असे आवाहनही त्यांनी केले. यानंतर दुपारी २ वाजता महागाव येथील स्टेट बँकेजवळील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेला पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी भेट दिली. येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सुमारे ५० ते ६० विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. भरती प्रक्रियेचे स्वरूप, लेखी परीक्षेची तयारी, शारीरिक चाचणीसाठी आवश्यक नियोजन, नियमित सराव आणि शिस्तबद्ध तयारी याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महागाव तहसीलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार अभय मस्के होते. युवकांनी कोणत्याही अफवा किंवा गैरमार्गाचा अवलंब न करता स्वतःच्या गुणवत्तेच्या आणि मेहनतीच्या जोरावर भरतीची तयारी करावी, असे आवाहन करताना पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भात कोणतीही अडचण अथवा शंका असल्यास थेट महागाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन वानखडे यांनी विद्यार्थ्यांना केले. महागाव पोलिसांनी एकाच दिवशी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत जनजागृती आणि पोलीस भरतीसाठी युवकांना प्रेरणा व मार्गदर्शन करण्याचा घेतलेला पुढाकार सर्व स्तरांतून स्वागतार्ह मानला जात आहे. स्वामी विवेकानंद अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची पुस्तके मोफत पुरवण्याची हमी यावेळी तहसीलदार मस्के यांनी दिली. महागाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विशाल पवार, महागाव तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष गणेश भोयर,पत्रकार निलेश पाटील नरवाडे, संपादक नंदू भाऊ कावळे, साप्ताहिक लोकचिंतनचे संपादक गजानन वाघमारे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Related posts

आमणी (खुर्द) येथे आंबेडकर जयंतीच्या बॅनरची विटंबना

वादग्रस्त वाळुसाठ्याप्रकरणी प्रदीप जगताप यांचे आमरण उपोषण मागे

महागाव–गुंज रस्त्यावर पॅचवर्कचा महाघोटाळा पुसद बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराचा कळस ठेकेदार–अधिकाऱ्यांची संगनमताने लूट

Chief Editor Gajanan waghmare

दिग्रस येथे रविवारी भव्य तालुकास्तरीय पशू प्रदर्शनी

Chief Editor Gajanan waghmare

हिंगोलीत ४.७ रिश्टरचा भूकंप

महागाव नगरपंचायत अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल 

Chief Editor Gajanan waghmare

Leave a Comment