लोकचिंतन

बेकायदा क्लिनिकचा पर्दाफाश

 

लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस

 

अकोला आरोग्य मंडळातील पाचही जिल्ह्यांमध्ये बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने फौजदारी कारवाई करण्याच्या उपसंचालकांच्या कडक निर्देशांनंतर आरोग्य विभाग ॲक्शन मोडमध्ये आला आहे. महागाव तालुक्यातील मुडाणा येथे आरोग्य विभागाच्या पथकाने धाड टाकून कथित बोगस डॉक्टरचे अनधिकृत क्लिनिक उघडकीस आणले. या कारवाईत रुग्णाला सलाईन लावताना हा बोगस ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आढळून आला. त्याच्याकडून स्टेथोस्कोप, विविध ॲलोपॅथी औषधे व इंजेक्शन्स जप्त करण्यात आली असून, महागाव पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला आरोग्य मंडळांतर्गत अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश उपसंचालक आरोग्य सेवा, अकोला मंडळ डॉ. सुशिलकुमार वाकचौरे यांनी ४ सप्टेंबर २०२६ रोजी दिले होते. ३ सप्टेंबरच्या आढावा बैठकीत बोगस डॉक्टरांविरुद्ध अपेक्षित कारवाई झालेली नसल्याने वरिष्ठ स्तरावरून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर आरोग्य यंत्रणेला कारवाईच्या सूचना देण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य प्रशासनाने ५ ऑक्टोबर रोजी मुडाणा येथे कारवाई केली. तालुकास्तरीय बोगस डॉक्टरविरोधी समितीचे सदस्य सचिव तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसेनजीत धुळधुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उज्वल जगदीश ठाकूर (४३, रा. मुडाणा) यांच्या राहत्या घरी धाड टाकून त्याच्या मुस्क्या आवळल्या.

रुग्णाला सलाईन लावताना आढळला

 

कारवाईदरम्यान उज्वल ठाकूर हा गळ्यात स्टेथोस्कोप घालून एका रुग्णाला सलाईन लावत असल्याचे पथकाला आढळून आले. घराची पाहणी केली असता रुग्ण तपासणी कक्षासह तीन खाटांचा आंतररुग्ण विभाग (IPD) सुरू असल्याचेही निदर्शनास आले. संबंधित व्यक्तीकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोंदणी अथवा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.

 

बोगस मुन्नाभाईच्या घरात ॲलोपॅथी औषधांचा साठा

 

बोगस बंगाली डॉ.उज्वल ठाकूर घरातील ऍलोपॅथिक औषधाच्या साठा पाहून आरोग्य विभागाचे पथक हैराण झाले. पंचनामा करून कारवाईदरम्यान विविध साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये ‘डॉ. यु. के. ठाकूर ND संभाजी नगर, मंगल क्लिनिक’ या नावाचे प्रिस्क्रिप्शन पॅड, स्टेथोस्कोप तसेच Ceftriaxone & Sulbactam, Piperacillin & Tazobactam, Chloroquine Phosphate, Betamethasone, Pantoprazole, Amikacin Sulphate आणि Diclofenac Sodium या औषधांचा समावेश आहे. तसेच Sterile Skin Stapler (Surgi Pler) आणि Lidocaine Spray आदी साहित्यही जप्त करण्यात आले.

वैद्यकीय व्यावसायिक अधिनियमांतर्गत गुन्हा

 

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसेनजीत धुळधुळे यांच्या फिर्यादीवरून उज्वल जगदिश ठाकूर याच्याविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, १९६१ मधील कलम ३३(१) व ३३(२) अन्वये महागाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किशोर मुरकुटे करीत आहेत.

 

रुग्णांच्या जीविताला गंभीर धोका

Ceftriaxone & Sulbactam, Piperacillin & Tazobactam आणि Diclofenac Sodium यांसारखी औषधे गंभीर संसर्ग व वेदनांच्या उपचारात वैद्यकीय देखरेखीखाली वापरली जातात. मात्र, वैद्यकीय पात्रता व अधिकृत नोंदणी नसलेल्या व्यक्तीच्या हातून अशा औषधांचा वापर होणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. विशेषतः इंजेक्शनच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे चुकीचा डोस, चुकीची पद्धत किंवा रुग्णाला असलेली औषधांची संवेदनशीलता लक्षात न आल्यास गंभीर प्रतिकूल प्रतिक्रिया उद्भवू शकतात. काही प्रसंगी तीव्र ॲलर्जिक प्रतिक्रिया होऊन ॲनाफिलॅक्टिक शॉकसारखी जीवघेणी स्थिती निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळे जीवनरक्षक ठरणारी हीच औषधे अयोग्य हातात गेल्यास जीवघेणी ठरू शकतात. मुडाणा येथील कारवाईत अशी औषधे सापडल्याने संबंधित व्यक्तीकडून वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली रुग्णांच्या जीविताशी गंभीर धोका निर्माण केला जात असल्याचा मुद्दा समोर आला आहे.

 

बोगस डॉक्टरांविरोधात कारवाईचा बडगा

ग्रामीण व दुर्गम भागात वैद्यकीय पात्रता नसलेल्या व्यक्तींकडून उपचार केले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर अकोला आरोग्य मंडळाच्या निर्देशानंतर यवतमाळसह पाचही जिल्ह्यांत बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मोहीम अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Related posts

नव्या देशी दारू दुकानाचा राजकीय खलनायक कोण ?

Chief Editor Gajanan waghmare

फुलसावंगीतील ४४ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

Chief Editor Gajanan waghmare

लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर!

शेणंद गावात ७० टक्के नागरिकांना अज्ञात तापा चा विळखा

Chief Editor Gajanan waghmare

१६ एप्रिलला होणार दारू दुकानाचा फैसला

Chief Editor Gajanan waghmare

मतदार यादीतील त्रुटींचा आडव्या बाटलीला फटका

Leave a Comment