लोकचिंतन

जनतेचा संताप आणि भावना पायदळी तुडवून महागाव शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये देशी दारू दुकान सुरू करण्यात आल्याने शहरातील सामाजिक व राजकीय वातावरण चिघळले आहे. प्रभागातील महिलांनी तीव्र आक्षेप दाखल केल्यानंतरही दारू दुकान सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, नगरपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगनमतानेच हा माणसे मारण्याचा नवा कारखाना शहरात सुरू करण्यात आल्याचा गंभीर आरोप नागरिक करीत आहेत. प्रभागातील महिला व नागरिकांनी यापूर्वी अनेकवेळा आंदोलन, लेखी हरकती व निवेदने देत दारू दुकानास विरोध दर्शविला होता. मात्र जनभावना पायदळी तुडवून दारू दुकान सुरू करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. परिणामी शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे. या दारू दुकानाच्या खेळाचा मुख्य राजकीय खलनायक कोण या बाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात असून, दारू दुकानासाठी लाखोंची खिरापत घेऊन “रेड कार्पेट” अंथरणारे तेच आणि तोंडापुरता विरोध दाखवून जनतेच्या डोळ्यात माती टाकणारेही तेच आहेत असा सनसनाटी आरोप देशी दारू दुकान हटाव आंदोलनाच्या मुख्य प्रवर्तक नगरसेविका जयश्री संजय नरवाडे यांनी केला आहे. नगरपंचायत कार्यालयाच्या प्रोसिडिंग रजिस्टरमध्ये काही महिन्यांपूर्वी देशी दारू दुकानासाठी देण्यात आलेल्या नाहरकत प्रमाणपत्राची गोपनियरित्या नोंद करण्यात आली होती. सा. लोकचिंतनने या खळबळजनक प्रकरणाची सर्व पाळेमुळे उघड करणारी बातमी सर्वात आधी प्रकाशित केली होती. प्रोसिडिंग रजिस्टर ला नाहरकत प्रमाणपत्राची नोंद असलेल्या पानांना स्टॅपलर पीन मारून हा ब्रम्हघोटाळा लपवून ठेवण्याचे कुटील कारस्थान रचण्यात आले मात्र हा घोटाळा सा. लोकचिंतनने पुराव्यानिशी उघड केला. त्यानंतर नगर पंचायतच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. सत्ताधारी आणि विरोधी गटांनी लागोपाठ पत्रकार परिषद घेऊन आपापली भुमिकाही मांडली होती. देशी दारू दुकान प्रकरणात शहरात बेअब्रू झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आमरण उपोषणाचा बागुलबुवा उभा करीत आपली बाजू सावरण्याचा खटाटोपही केला होता. तरीही दारू दुकानाला दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी तत्कालिन मुख्याधिकारी रास्ता रोको आंदोलनाच्या ठिकाणी आले नव्हते. शेवटी प्रशासन अधिकारी यांच्या हस्ते पत्र घेऊन वेळ मारून नेण्यात आली होती. नेमका या पत्राचा संदर्भ घेऊन देशी दारू दुकान मालकाने न्यायालयात धाव घेतली आणि हा चेंडू पुन्हा जिल्हाधिकारी यांच्या दालनात आला. जिल्हाधिकारी यांनी प्रकरणाची सुनावणी ठेवल्यानंतर नगरपंचायतचे मुख्याधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी सुद्धा गुळमुळीत भुमिका घेतली आणि शेवटी महागाव शहरातील या दारू दुकानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी दिली. सत्ताधाऱ्यांची संशयास्पद भूमिका आणि त्यानंतर दारू दुकानाच्या मालकाने न्यायालयातून मिळवलेली परवानगी, या सर्व घडामोडींमुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. सत्ताधाऱ्यांनी यापूर्वी या नाहरकत प्रमाणपत्राच्या रद्दबातल मागणीसाठी उपोषण केल्याचा दावा केला होता. मात्र उपोषण संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच दारू दुकान सुरू करण्याच्या हालचालींना वेग आल्याने हे उपोषण जनहितासाठी होते की राजकीय आणि आर्थिक स्वार्थासाठी, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

या संपूर्ण प्रकरणात नगरसेविका जयश्री संजय नरवाडे यांनी सुरुवातीपासूनच ठाम व स्पष्ट भूमिका घेतली आहे. देशी दारू दुकानामुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात येईल, कुटुंबव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल आणि युवकांचे भविष्य अंधारात जाईल, असे त्यांनी वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यांनी लेखी हरकती सादर करून हा प्रश्न सामाजिक आरोग्याशी संबंधित असल्याचे प्रशासनापुढे मांडले .मात्र त्यांच्या भूमिकेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

नगरपंचायतच्या प्रोसिडिंगमध्ये कथित फेरफार झाल्याचा प्रकारही पुढे आला असून काही कागदपत्रांमध्ये खोडतोड, स्टेपलरने पाने लपवणे तसेच नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांच्या कथित बनावट सह्या आढळून आल्याच्या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असली तरी पुढील कारवाई गुंडाळून ठेवण्यात आल्याने ही तक्रार ‘दडपली’ जात असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत. आज दारू दुकान सुरू करण्याची प्रक्रिया सुरू होताच घटनास्थळी नगरसेवक, दुकान मालक आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. दुकान सुरू झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला. मात्र न्यायालयीन आदेश आणि जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या परवानगीच्या आधारे दारू दुकान सुरू होत असल्याचे तुणतुणे दुकान मालक वाजवत असल्याने येथे धुमश्चक्री उडण्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रभागातील महिलांनी एकत्र येत दारू दुकान बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात निवेदन तयार करण्यात आले असून तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व नगरसेविका जयश्री नरवाडे करणार आहेत. शहरतील ओपन स्पेस ची विक्री, घनकचरा टेंडर मध्ये भागिदारी, डमी ठेकेदारीत शहरातील रस्त्यांचा बोजवारा, विद्युत पोल परवागी प्रकरणात कोट्यवधी रुपयांची खिरापत, या आधीच्या दारू दुकानात छुपी भागीदारी असे अनेक गरमागरम मुद्दे शहरात आक्रमकपणे चर्चिले जात असून या एकुणच प्रकरणाचा मास्टरमाईंड खलनायक कोण आहे या बाबत उघड चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान प्रभाग १ मधील शेकडो महिलांना घेऊन नगरसेविका जयश्री नरवाडे आजच जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून दारू दुकानाविरोधात तेथे निवेदन देणार आहेत.

Related posts

नगर पंचायत मध्ये काँग्रेसचे ‘वाजले की बारा’

Chief Editor Gajanan waghmare

लोकचिंतन न्यूज पोर्टल जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारे व्यासपीठ ठरेल – गणेश भोयर

लोणार येथील दैत्यसुदन मंदिर- मध्ययुगीन वास्तुकलेचा अद्वितीय नमुना

१२ नगरसेवक ‘नॉट रिचेबल’

Chief Editor Gajanan waghmare

महागाव–गुंज रस्त्यावर पॅचवर्कचा महाघोटाळा पुसद बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराचा कळस ठेकेदार–अधिकाऱ्यांची संगनमताने लूट

Chief Editor Gajanan waghmare

धर्मरक्षणासाठी दिव्य विशाल हिंदू संमेलन

Chief Editor Gajanan waghmare

Leave a Comment