लोकचिंतन

 

तहसीलदारांची वरूण गॅस एजन्सीला कारणे दाखवा नोटीस

 

लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस

 

नागरिकांना घरपोच गॅस पुरवठा करण्यात होत असलेल्या गंभीर त्रुटी आणि गॅस सिलिंडर साठविलेल्या गोदाम परिसरात जीवघेण्या उन्हात ग्राहकांना ताटकळत ठेवणाऱ्या महागाव येथील वरुण गॅस एजन्सीला तहसील प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वारंवार सूचना देऊनही सेवा सुधारण्यात दिरंगाई व चालढकल करणाऱ्या संबंधित एजन्सीकडून खुलासा मागविण्यात आला असून, समाधानकारक उत्तर न दिल्यास कडक कारवाईचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, विविध नागरिकांनी लेखी, तोंडी तसेच दूरध्वनीद्वारे गॅस वितरणातील अनियमिततेबाबत तक्रारी नोंदवल्या आहेत. यामध्ये वेळेवर घरपोच गॅस न मिळणे, नागरिकांना तास न् तास प्रतीक्षा करावी लागणे आणि वितरण व्यवस्थेतील गैरसोयींचा समावेश आहे. विशेषतः १६ एप्रिल रोजी भर उन्हात एका शेतात गॅसचे वितरण केल्याची बाब उघडकीस आली असून, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचेही निदर्शनास आले आहे. सद्यस्थितीत तापमान ४१ ते ४४ अंश सेल्सिअस दरम्यान असताना नागरिकांना उघड्यावर रांगेत उभे राहावे लागत असल्याने उष्माघातासारख्या गंभीर परिस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. शासनाच्या घरपोच गॅस वितरणाच्या स्पष्ट आदेशांचे उल्लंघन होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित गॅस एजन्सीला दैनंदिन बुकिंग संख्या, मागणीसंदर्भातील कागदपत्रे आणि सध्याच्या परिस्थितीबाबत सविस्तर खुलासा २० एप्रिलपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वेळेत खुलासा न केल्यास ‘जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५’ तसेच ‘पेट्रोलियम प्रोडक्ट्स मेंटेनन्स ऑफ प्रोडक्शन, स्टोरेज अँड सप्लाय ऑर्डर १९९९’ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची ताकिद देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related posts

देशी दारू दुकानावरून स्थानिक नगरसेविकेचे मौन संशयास्पद

वीजप्रवाहाच्या धक्क्याने २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

गुंज सबस्टेशनवरील एजी पंपांचा वीजपुरवठा तीन दिवसांपासून खंडित  

Chief Editor Gajanan waghmare

हिंगोलीत ४.७ रिश्टरचा भूकंप

लोकचिंतन न्यूज पोर्टल जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारे व्यासपीठ ठरेल – गणेश भोयर

महागाव येथे राष्ट्रीय लोकअदालतीत १२९ प्रकरणे निकाली

Chief Editor Gajanan waghmare

Leave a Comment