महिलांचा निकालावर आक्षेप
महागाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १ मध्ये देशी दारूचे दुकान व बैठक वाईन बार हटविण्यासंदर्भात घेण्यात आलेल्या मतदानाच्या निकालावर महिला मतदारांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. मतदान प्रक्रियेत त्रुटी राहिल्याचा आरोप करत संबंधित निकालाचा पुनर्विचार करण्याची मागणी महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. महिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ एप्रिल रोजी सावित्रीबाई फुले कन्या महाविद्यालयात बाटली आडवी करण्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मयत मतदारांची ५ मते वजा करून एकूण १४० मते ग्राह्य धरण्यात आली. मात्र, मतदार यादीत दोन महिला मतदारांची नावे दुबार असल्याचे निदर्शनास आणून देऊनही ती वजा करण्यात आली नाही. त्रुटी असलेली मतदार यादी मुख्याधिकारी यांनी मतदान प्रक्रियेत वापरली. दारू दुकानाच्या बाजुने कौल मिळावा असा प्रशासनाचा आटापिटा होता. संबंधित नावे वजा केल्यास मतदारसंख्या १३८ धरली जावी, असे महिलांचे म्हणणे आहे. तसेच, एका महिला मतदाराने मतपत्रिकेवर अधिकृत शिक्का न मारता अंगठ्याचा ठसा उमटविल्याची बाब समोर आली आहे. हा ठसा ‘आडवी बाटली’ या चिन्हासमोर असल्याने संबंधित मत वैध धरावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अज्ञानामुळे चुकीची पद्धत वापरली असली, तरी मतदाराची भूमिका स्पष्ट असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. महिला मतदारांच्या मागणी नुसार, एकूण ७७ मतदानांपैकी ७० मते ‘आडवी बाटली’ या चिन्हाच्या बाजूने पडली आहेत. त्यामुळे निकाल जाहीर करताना संबंधित बाबींचा विचार करून योग्य निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, मतदान केंद्रावर लेखी आक्षेप नोंदविण्यास नकार देण्यात आल्याचा आरोपही महिलांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय्य तोडगा काढण्याची मागणी सौ. छाया राजाराम नरवाडे, सौ. संजिवनी प्रकाश भेंडे, सौ. बेबीताई प्रकाश गाडबैले, सौ.सुप्रिया निलेश गाडबैले, सौ.सविता सुरेश रुणवाल, सौ. कविता विजय नेवारे, सौ. कविता अविनाश अमिलकंठवार, सौ. संगिता संजय अमिलकंठवार, सौ.पुनम निलेश अमिलकंठवार सौ. स्नेहल अमोल अमिलकंठवार नाजनिन मो. वसीम पारेख, महेविश मो. रियाज पारेख, सौ. वंदना विनायक पानपट्टे यांनी केली आहे.

