काठावर सापडली सुसाईड नोट
लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस
पुसद येथील मुंगसाजी नगर परिसरात राहणारे सेवानिवृत्त पोस्टमन उत्तम मोहन रुढे (वय ६५) यांनी महागाव तालुक्यातील कोनदरी येथील तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उत्तम रुढे हे मूळचे मुंगसाजी नगर (पुसद) येथील रहिवासी असून टपाल खात्यातून निवृत्त झाले होते अशी माहिती मिळाली आहे. कोनदरी येथे त्यांची मुलगी व जावई राहत असल्याने ते बऱ्याचदा तेथे जाऊन राहत असत. याशिवाय ते काही काळ वृद्धाश्रमातही राहिल्याची माहिती समोर येत आहे.
तलावाच्या काठावर सापडली सुसाईड नोट व वस्तू
घटना उघडकीस आल्यानंतर कोनदरी तलावाच्या काठावर मृत उत्तम रुढे यांच्या दोन कापडी पिशव्या, चप्पल आणि एक सुसाईड नोट आढळून आली. “मी माझ्या स्वखुशीने आत्महत्या करत आहे,” असा उल्लेख या चिठ्ठीत असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच कोनदरी येथील सरपंच तथा महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र पवार यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. गावात घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिकांनी तलावाच्या काठावर मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, वयाच्या ६५ व्या वर्षी उत्तम रुढे यांनी हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणांमुळे उचलले, यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. महागाव पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून पोलीस तपासाअंतीच आत्महत्येचे खरे कारण समोर येणार आहे.

