पिण्याचे पाणी व पशुधनासाठी साठा राखीव
यवतमाळ पाटबंधारे विभागाच्या निर्णय
लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस
रब्बी हंगामाच्या तोंडावर अधरपुस मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठा अत्यल्प असून आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची गरज आणि पशुधनासाठी पाणी उपलब्ध ठेवणे आवश्यक असल्याने रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये अधरपुस धरणाच्या कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी सोडता येणार नाही, अशी माहिती यवतमाळ पाटबंधारे विभागाने स्पष्ट केली आहे. त्यामुळे कालव्याच्या पाण्यावर रब्बी पिकांची भिस्त ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना आता पेरणीचे नियोजन उपलब्ध पर्यायी सिंचन व्यवस्थेनुसारच करावे लागणार आहे. जलसंपदा विभागाच्या ५ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांनुसार, ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत नागरिकांना पिण्यासाठी तसेच पशुधनासाठी आवश्यक पाणीसाठा सुरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. अधरपुस धरणातील उपलब्ध साठ्यातून पिण्याच्या पाण्याचे आरक्षण, बाष्पीभवन तसेच अन्य आवश्यक बाबींचा विचार केल्यानंतर सिंचनासाठी उपलब्ध होणारा साठा अत्यल्प राहतो. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कालव्याद्वारे रब्बी सिंचनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेणे शक्य नसल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे.
पेरणीपूर्वीच पाण्याचा हिशेब करा
या निर्णयामुळे अधरपुस प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या पेरणीपूर्वी उपलब्ध पाण्याचा काटेकोरपणे हिशेब करणे आवश्यक झाले आहे. कालव्याचे पाणी मिळेल या अपेक्षेवर पेरणी करून नंतर पिके पाण्याअभावी अडचणीत येऊ नयेत, यासाठी शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोअरवेल किंवा अन्य वैयक्तिक सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी त्या पाण्याच्या क्षमतेनुसारच क्षेत्र आणि पिकांची निवड करावी. कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य देणे, उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे आणि गरजेपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी न करणे, हे यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
दुष्काळी परिस्थितीची तीव्रता वाढली
अल-निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई आणि अपुरा पाणीसाठा यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचा वापर करण्याऐवजी पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी आवश्यक साठा सुरक्षित ठेवण्याला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. परिणामी यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पाण्याच्या उपलब्धतेनुसारच पीक पद्धती ठरवावी लागणार आहे. दरम्यान, रब्बी हंगामातील चारा पिकांच्या लागवडीबाबत शासनाकडून सुधारित निर्देश प्राप्त झाल्यास त्यानुसार शेतकऱ्यांना माहिती देण्यात येईल, असेही पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. अधरपुस धरणातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती आणि आगामी उन्हाळ्याची गरज लक्षात घेता नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पिण्याचे पाणी व पशुधनासाठी आवश्यक साठा अबाधित राहील, यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पाटबंधारे उपविभाग क्रमांक ४, महागावच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी केले आहे. रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वीच कालव्याचे पाणी उपलब्ध होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने अधरपुस लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आता भावनेपेक्षा उपलब्ध पाण्याचा विचार करून पिकांचे नियोजन करणे गरजेचे आहे. पाण्याची खात्री नसताना पेरणीचा धोका न पत्करता, उपलब्ध सिंचन क्षमतेनुसारच क्षेत्र निश्चित करावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

