लोकचिंतन

जीपीएस लोकेशन वरून तेलंगणतीत पथक

महागावात धडकले

 

आठवडी बाजारात दोन गटात तुंबळ हाणामारी

 

तेलंगणात नोंदणीकृत असलेल्या ‘थार’ (TS 08 JU 5798) वाहनाच्या मालकी हक्कावरून शुक्रवारी महागाव शहरातील बाजारपेठ परिसरात दोन गटात अक्षरशः धुमश्चक्री उडाली. जीपीएस तंत्रज्ञानाच्या आधारे वाहनाचे लोकेशन घेत तेलंगणातून आलेल्या एक गटाने बळजबरीने वाहन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या वादात दोन्ही गट आमनेसामने भिडल्याने जोरदार हाणामारी सुरू झाली. या घटनेमुळे संपूर्ण बाजारपेठ परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित थार वाहन मूळतः हैदराबाद येथील जसवंत रेड्डी यांच्या नावावर होते असे कळते. पुढे त्यांनी हे वाहन निजामोदिन हुसेन सय्यद यांना विकले. त्यानंतर हे वाहन भाडेतत्त्वावर इम्रान नामक व्यक्तीकडे देण्यात आले आणि नंतर ते अमीर याच्या ताब्यात गेल्याचे सांगितले जाते. दरम्यान, आर्थिक व्यवहारातून हेच वाहन उमरखेड परिसरातील एका व्यक्तीकडे सुमारे ३ लाख ८० हजार रुपयांमध्ये गहाण ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या गुंतागुंतीच्या व्यवहारांमुळे वाहनाचा ठावठिकाणा लागत नसल्याने निजामोदिन हुसेन सय्यद यांनी वाहनात बसविण्यात आलेल्या जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीमचा आधार घेत शोधमोहीम सुरू केली. शुक्रवारी वाहनाचे लोकेशन महागाव शहरात आढळताच ते आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने येथे धडकले. मात्र, या वेळी वाहन महागाव येथील इब्राहिम बागवान यांच्या ताब्यात असल्याचे समोर आले. वाहन ताब्यात घेण्याच्या प्रयत्नावरून दोन्ही गटांमध्ये जोरदार बाचाबाची सुरु झाली, आणि काही क्षणांतच वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. भर बाजारपेठेत अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. रस्त्यावर मोठी गर्दी उसळल्याने काही काळासाठी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांनी सुरक्षित अंतर राखत परिस्थितीचा तणावपूर्ण अनुभव घेतला. जवळपास तासभर बाजारपेठ परिसरातील जनजीवन ठप्प झाले होते.

घटनेची माहिती मिळताच टाऊन जमादार एडतकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सिव्हिल ड्रेसमध्ये असल्याने त्यांना कुणीच जुमानले नाही आणि गोंधळ मोठ्याप्रमाणात वाढला. त्यानंतर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त घटनास्थळी पोहोचला आणि परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिसांनी संबंधित सर्व व्यक्तींना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले आहे. प्राथमिक तपासानुसार, हा वाद वाहनाच्या मालकी हक्क, कथित चोरी आणि गुंतागुंतीच्या आर्थिक व्यवहारांमधून निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे. वाहन कोणाच्या कायदेशीर ताब्यात होते, ते विविध व्यक्तींपर्यंत कसे हस्तांतरित झाले आणि आर्थिक देवाणघेवाण नेमकी कशी झाली, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, जीपीएस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बाहेर राज्यातून आलेल्या पथकामुळे आणि त्यानंतर झालेल्या थरारक हाणामारीमुळे महागाव शहरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Related posts

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू

वादग्रस्त वाळुसाठ्याप्रकरणी प्रदीप जगताप यांचे आमरण उपोषण मागे

महागाव नगरपंचायत अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल 

Chief Editor Gajanan waghmare

सवना येथील जि. प. कन्या शाळा रामभरोसे

Chief Editor Gajanan waghmare

दलित शेतकरी कुटुंबाला भूमिहीन करून फसवणूक

Leave a Comment