काळी (टेंभी) शिवारातील विहिरीत आढळला मृतदेह
लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस
महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील ४४ वर्षीय शेतकरी जगजीवन भिकाजी डोंगरे यांनी काळी (टेंभी) शेतशिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, डोंगरे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, जगजीवन डोंगरे यांची गट क्रमांक २२ मध्ये सुमारे १.४० हेक्टर जमीन आहे. आज सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास काळी (टें) येथील याच शेतशिवारातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
जगजीवन डोंगरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या अकस्मात मृत्यूने कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून, फुलसावंगीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, डोंगरे यांनी हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कौटुंबिक, आर्थिक अथवा अन्य कोणते कारण होते का, याचा तपास पोलीस करीत आहेत. घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांच्या तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक कयास आहे. पोलिसांकडून आणि तहसील प्रशासनामार्फत तपास सुरू आहे.

