संपूर्ण १७ प्रभागात मोहिम राबविणार
कचऱ्याचा उकीरडा झालेल्या महागाव शहराला स्वच्छ, निटनेटके करून प्रगतीपथावर नेण्याचा शब्द भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी दिला होता. या अश्वासनाची पुर्तता करण्यासाठी त्यांनी आजपासून महागाव शहरात स्वच्छता अभियानाचा धडाक्यात श्रीगणेशा केला. नगर पंचायत कार्यालय असलेल्या प्रभाग १ मधून ही स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली. ३० कामगारांची चमू आता महागाव शहरात दररोज स्वच्छतेची कामे करणार आहेत. शहरातील सर्व १७ प्रभागांमधील सांडपाण्याच्या नाल्या उपसून गाळ व घाण बाहेर काढली जाणार आहे. यापुर्वीच्या गलथान प्रशासनाने शहरात कचऱ्याचे ढिगारे निर्माण केले. डमी ठेकेदारीतून खिसे भरण्याचा कार्यक्रम राबविला. संस्था दारव्ह्याची, पडद्यामागचा ठेकेदार महागावचा अशी अवस्था होती. वर्षभरात १ महिनाही घनकचरा संकलनाचे काम अंदाजपत्रकानुसार शहरात करण्यात आले नाही. सहा ते आठ महिने घंटागाड्या बंद होत्या. नावापुरते चार मजूर कामाला लावून घनकचरा संकलनाचा फार्स करण्यात आला. टेंडर चे सर्व पैसे खिशात घालण्याचा हा आघोरी उपक्रम राबविण्यात आला. परिणामी महागाव शहराला डम्पिंग ग्राउंड चे स्वरूप आले. या घाणीने शहराचा श्वास गुदमरला. अनेक नागरिकांना साथीच्या आजाराला सामोरे जावे लागले. प्रदूषित वातावरणामुळे श्वसन संस्थेचे आजार जडले. डमी ठेकेदाराच्या पापामुळे शहरात भ्रष्टाचाराची व अस्वच्छतेची दुर्गंधी पसरली. ही सगळी पापे धुऊन काढण्याचा संकल्प नितीन भुतडा यांच्या मार्गदर्शनात नवनिर्वाचित अध्यक्ष रंजनाताई आडे यांनी केला आहे. आजपासून महागाव शहरात धुमधडाक्यात स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले. गोदावरी अर्बन बँकेच्या समोरील चौकात या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, नगराध्यक्ष रंजनाताई आडे, उपनगराध्यक्ष प्रमोद उर्फ शाका भरवाडे, लोकनेते तथा नगरसेवक रामराव पाटील नरवाडे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष दीपक आडे, नगरसेवक गजानन साबळे, माजी उपनगराध्यक्ष सुरेश नरवाडे, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका करुणा शिरबिरे, नगरसेविका जयश्री नरवाडे, जयश्री इंगोले, सुनीता डाखोरे,स्वीकृत नगरसेवक सुजित ठाकूर, नारायण शिरबिरे,रवी राजवाडे, संजय अमिलकंठवार, प्रामुख्याने उपस्थित होते. संपूर्ण १७ प्रभागांमध्ये ही स्वच्छता मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा रंजनाताई आडे यांनी दिली.
१ एप्रिल पासून अग्निशामक दल शहरवासीयांच्या सेवेत
मागील सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रिय कारभारामुळे जागीच उभी असलेली अग्निशामक यंत्रणा एक एप्रिल पासून कार्यरत होईल असा शब्द नितीन भुतडा यांनी दिला आहे. ३१ मार्च ची प्रशासकीय लगबग आटोपताच नगरपंचायतचा अग्निशामक बंब लोकांच्या सेवेत कार्यरत होईल. यासोबतच रुग्णवाहिका महागाव येथील सत्यसाई समितीच्या देखरेखित कार्यरत करण्यात आली असून, महागाव शहरातील अत्यावश्यक रुग्णांना ही सेवा पुरवण्यात येणार असल्याची माहिती नितीन भुतडा यांनी यावेळी दिली.

