लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस
निसर्गाची अवकृपा, सततची नापीकी आणि डोक्यावर वाढत चाललेला कर्जाचा डोंगर.या साऱ्या विवंचनेत होरपळून गेलेले माळवागद येथील अल्पभूधारक शेतकरी विष्णू रोडबा जाधव यांनी २५ जानेवारी २०२५ रोजी विषाचा घोट घेऊन जीवनयात्रा संपवली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एका कष्टकरी शेतकऱ्याचा मृत्यू झाला, पण त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या कुटुंबाची आभाळवेदना मात्र संपली नाही. पतीच्या आत्महत्येनंतर विधवा पत्नी श्रीमती रंजना जाधव आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्याच्या खात्यात शासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या खरडीपोटी २२ हजार ५०० रुपये अनुदान जमा केले आहे. मात्र, ही रक्कम मिळवण्यासाठी एका विधवा महिलेला गेल्या वर्षभरापासून बँकेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. सर्व कायदेशीर वारस कागदपत्रे सादर करूनही बँक अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टू आणि मनमानी कारभारामुळे रंजना जाधव यांना पतीच्या खात्यातील अनुदान नाकारले जात आहे. कागद आणा, सही आणा, पुन्हा या अशा उत्तरांनी तिच्या वेदनांवर मीठ चोळले जात आहे. अल्पभूधारक शेतकरी विष्णू जाधव यांचे माळवागद शिवारात शेत होते. सततच्या नापिकीमुळे आणि बँक व खासगी सावकाराच्या कर्जाच्या ओझ्याखाली ते पूर्णपणे खचले होते. हताश अवस्थेत त्यांनी शेतातच कीटकनाशक प्राशन केले. त्यांना तातडीने पुसद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या दुर्दैवी घटनेला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, शासनाची मदत मिळण्याआधीच बँकेच्या हेकेखोर कारभारामुळे एक विधवा महिला अक्षरशः उद्ध्वस्त होत आहे. काल श्रीमती रंजना जाधव महागाव तहसील कार्यालयात तहसीलदार अभय मस्के यांच्यासमोर साश्रू नयनांनी आपली व्यथा मांडली. माझ्या पतीने मरण पत्करले, आता आम्हालाही जगण्याचा अधिकार नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या कुटुंबाची फरफट थांबत नसेल, तर ही व्यवस्था नेमकी कुणासाठी आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
