नगराध्यक्ष सुनंदा सुरोशे पायउतार
अविश्वास ठराव बारा विरुद्ध शुन्य मतांनी पारित
महागाव नगर पंचायतीत चार वर्षाच्या सत्ताकाळात दुसऱ्यांदा राजकिय उलटफेर झाला. काँग्रेस महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष सुनंदा दिलीप सुरोशे कोपरकर यांच्या विरोधात नगर सेवकांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव बारा विरुद्ध शुन्य मतांनी पारित झाला त्यामुळे नगराध्यक्षांना पायउतार व्हावे लागले आहे. गटनेते शैलेश सुरोशे कोपरकर यांनी आपल्या आईचे नगराध्यक्षपद वाचविण्यासाठी पराकोटीचा आटापिटा केला परंतू त्यांना अखेर तोंडघशी पडावे लागले. नगराध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वी नगर पंचायत सभागृहाच्या परिसरात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी दोन्ही गटांचे समर्थक उपस्थित होते,त्यामुळे तणावाची स्थिती होती मात्र अखेर कोपरकर गटाने समोर पराभव अटळ असल्याचे दिसताच सभागृहातून काढता पाय घेतला. काँग्रेस गटनेते शैलेश सुरोशे कोपरकर यांच्या मनमानी कारभारामुळे विरोधक बिथरले होतेच परंतू सत्तेत काँग्रेस सोबत असलेल्या नगरसेवकांचा विश्वासही कोपरकर यांनी गमावला होता. त्यामुळे भाजपाचे गटनेते गजानन सोपान साबळे, माजी उपनगराध्यक्ष सुरेश उत्तमराव नरवाडे, सौ.रंजना दीपक आडे,
सौ.अशा शंकर बावणे,
शिवसेनेचे नगरसेवक तथा विद्यमान उपनगराध्यक्ष
प्रमोद उर्फ शाका भरवाडे,
रामराव काशिनाथ नरवाडे,
युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल प्रकाश पांडे,
सौ.सुनीता शिवाजी डाखोरे, सौ. करुणा नारायण शिरबिरे. या सोबतच सत्ताधारी काँग्रेस चे मो. परवेज शफी सुरैया,
श्रीमती जयश्री अशोक इंगोले, सौ.जयश्री संजय नरवाडे या सर्वपक्षीय बारा नगरसेवकांनी नगराध्यक्षांची उचलबांगडी करण्यासाठी कंबर कसली होती. १० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष अविश्वास प्रस्ताव दाखल करून १२ नगरसेवक पर्यटनासाठी गेले होते. नॉट रिचेबल असलेल्या नगरसेवकांपैकी काही जण कोपरकर गटाचे “आर्थिक लाभार्थी” होते. त्यांना हुडकुन काढण्यासाठी शोधमोहिम राबविण्यात आली पण ते हाती लागले नाही. जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावात अनेक त्रुट्या असल्याचा पवित्रा घेत अध्यक्षा सुनंदा सुरोशे कोपरकर यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिकाही दाखल केली होती त्यामुळे आज नेमका काय निर्णय येईल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. परंतू न्यायालयाने ही याचिका सकाळीच निकाली काढली आणि विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या. साडेअकरा वाजता नगरसेवकांचा ताफा पोलीस बंदोबस्तात नगर पंचायत सभागृहात दाखल झाला. अविश्वास प्रस्ताव उधळण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्यानंतर गटनेते शैलेश कोपरकर यांनी शस्त्र म्यान केले. शेवटी नगराध्यक्षा सुनंदा कोपरकर यांच्या विरोधतील अविश्वास ठराव बारा विरुद्ध शुन्य मतांनी पारित झाल्याची घोषणा पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी केली. नगराध्यक्ष सुनंदा सुरोशे कोपरकर, गटनेते शैलेश सुरोशे कोपरकर, नगरसेविका सुरेखा विनोद कोपरकर, रुपाली संतोष कोल्हेकर आणि नगरसेवक महेश पाटील हे मतदानाला सभागृहात उपस्थित नव्हते.
शहराच्या विकासासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची वज्रमुठ
मागील अडीच वर्षात महागाव शहरात विकास कामांची अक्षरशः लांडगेतोड झाली. महाराष्ट्रातील सर्वांत बदनाम नगर पंचायत अशी महागाव ची ओळख निर्माण झाली. शहराला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची मोट बांधून भ्रष्ट सत्तेचा अंत करण्यात आला आहे. येत्या वर्षभरात शहरात मोठ्याप्रमाणात विकास कामे मार्गी लावली जातील अशी प्रतिक्रिया भाजपाचे गटनेते गजानन साबळे यांनी व्यक्त केली.
शिवसेना जिल्हा प्रमुखांची शिष्टाई असफल
महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख तथा महागाव न.पं चे उपाध्यक्ष प्रमोद उर्फ शाका भरवाडे यांनीच पक्षादेश खुंटीला टांगून महविकास आघाडी गोत्यात आणली. त्यांची समजूत काढण्यासाठी सेनेचे जिल्हा प्रमुख प्रविण शिंदे आणि राजेंद्र गायकवाड स्वतः न.प सुभागृहाबाहेर तळ ठोकून होते. पर्यटनाला गेलेल्या नगरसेवकांची ट्रॅव्हल्स येताच त्यांनी प्रमोद भरवाडे यांचे ब्रेन वॉशिंग करण्याचा प्रयत्न केला परंतू ‘माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे’ असे उत्तर देत प्रमोद भरवाडे यांनी वरिष्ठांना निरुत्तर केले व सभागृहात जाऊन मतदान केले.

