५२ लाख २८ हजार ९५५ रुपयांची दंड व तडजोडीची वसुली
लोकअदालतीमुळे दूर झाली कटुता; सासू-सुनेच्या नात्यात पुन्हा गोडवा
लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महागाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आज शनिवारी (दि. १४ मार्च २०२६) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकअदातीत दाखल व दाखलपूर्व मिळून एकूण १२९ प्रकरणे आपसी तडजोडीतून निकाली काढण्यात आली. विविध प्रकरणांमधून ५२ लाख २८ हजार ९५५ रुपयांची दंड व तडजोडीची रक्कम वसूल करण्यात आली. लोकअदालतीत दाखल असलेली ९८ प्रकरणे तडजोडीतून निकाली काढण्यात आली, तर ३१ वादपूर्व प्रकरणे परस्पर सामंजस्याने मार्गी लावण्यात आली. यामध्ये पाच वर्षांपासून प्रलंबित असलेले भारतीय परक्राम्य अभिलेख कायद्यान्वये एक प्रकरण निकाली निघाले. तसेच तीन दिवाणी दावेही तडजोडीने निकाली काढण्यात आले.
विशेष म्हणजे एका दिवाणी प्रकरणात सासू-सुनेतील मतभेद मिटून नात्यात पुन्हा गोडवा निर्माण झाला, त्यामुळे लोकअदालतीचे सामाजिक महत्त्व अधोरेखित झाले.
_____________________________
लोकअदालतीला चांगला प्रतिसाद
एकूण निकाली प्रकरणे : १२९
दाखल प्रकरणे तडजोडीतून निकाली : ९८
वादपूर्व निकाली प्रकरणे : ३१
एकूण वसुली : ₹५२,२८,९५५
भारतीय परक्राम्य अभिलेख अंतर्गत प्रकरण : १
दिवाणी दावे निकाली : ३
______________________________
विशेष प्रकरणाचा निपटारा
पाच वर्षांपासून प्रलंबित प्रकरण लोकअदालतीत निकाली निघाले. तसेच सासू-सुनेतील वाद मिटून कुटुंबातील नातेसंबंधांना पुन्हा नवी दिशा मिळाली.
“लोकअदालतीच्या माध्यमातून दीर्घकाळ प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली निघतात आणि आपसी तडजोडीमुळे समाजात सौहार्द टिकून राहते.” असे मत न्यायधिशांनी व्यक्त केले. राष्ट्रीय लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका विधी सेवा प्राधिकरण समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी साहिल राकेश जैन यांनी पॅनल न्यायाधीश म्हणून काम पाहिले, तर ॲडव्होकेट पल्लवी खंदारे यांनी पॅनल सदस्य म्हणून सहकार्य केले. या लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी दिवाणी न्यायालय महागाव येथील सहाय्यक अधीक्षक एस. एस. तळेगावकर, तालुका विधी सेवा समितीचे कनिष्ठ लिपिक मोहम्मद अजीम, तसेच न्यायालयीन कर्मचारी पेज, फुले, मदने, जाधव, पवार, नरवाडे, बोरकर, लावरे व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. महागाव पोलीस स्टेशन व वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले.

