लोकचिंतन

भक्ती मंगल कार्यालयात आज सत्कार सोहळा

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महागाव तालुक्यातील चार भूमिपुत्र संचालक म्हणून निवडून आल्याने तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील राजकीय व सामाजिक अपेक्षा उंचावल्या आहेत. महागाव तालुक्यातून एकाच वेळी चार संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर निवडून जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या विजयाकडे तालुक्याच्या सहकार क्षेत्रासाठी ऐतिहासिक संधी म्हणून पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित संचालकांचा आज शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता भक्ती मंगल कार्यालय, महागाव येथे भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. निवडणुकीत नितीनभाऊ भुतडा (महागाव तालुका गट), सौ. स्मिताताई साहेबराव कदम पाटील (महिला राखीव जिल्हा गट), ॲड. महेशकुमार शिवाजीराव राठोड (विजाभज जिल्हा गट) आणि ज्ञानेश्वर उर्फ नानाभाऊ गाडबैले (पतसंस्था जिल्हा गट) हे चारही उमेदवार विजयी झाले. त्यामुळे महागाव तालुक्याला जिल्हा बँकेच्या निर्णयप्रक्रियेत यापूर्वीपेक्षा अधिक प्रभावी प्रतिनिधित्व मिळाले आहे.

मोडकळीस आलेल्या बँक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर

 

महागाव येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जुनी व मोडकळीस आलेली इमारत अनेक वर्षांपासून तालुक्यातील खातेदार, शेतकरी आणि सहकार क्षेत्रातील नागरिकांच्या चर्चेचा विषय आहे. आता तालुक्यातील चार संचालकांना जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर प्रतिनिधित्वाची संधी मिळाल्याने महागाव येथील बँकेची इमारत नव्याने उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बँकेची सुसज्ज व सुरक्षित इमारत उभी राहिल्यास शेतकरी, खातेदार, सहकारी संस्थांचे पदाधिकारी तसेच सर्वसामान्य ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा मिळू शकतील. त्यामुळे या प्रश्नाचा केवळ स्थानिक पातळीवरील इमारतीचा विषय म्हणून नव्हे, तर तालुक्याच्या सहकार क्षेत्राच्या विकासाचा भाग म्हणून विचार करण्याची गरज आहे.

शेतकरीहिताचे निर्णय घेण्याची अपेक्षा

महागाव तालुका हा प्रामुख्याने कृषिप्रधान असून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहारातील महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे नवनिर्वाचित संचालकांनी तालुक्याला मिळालेल्या या प्रतिनिधित्वाचा उपयोग पीककर्ज, कर्जवाटप, कर्जपुनर्गठन, पीकविमा, शेतीपूरक व्यवसायांसाठी अर्थसहाय्य आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या धोरणांसाठी करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेषतः दुष्काळी परिस्थिती, वाढता शेतीखर्च आणि नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर आणि सुलभ कर्जपुरवठा मिळणे, सहकारी संस्थांना बळकटी मिळणे आणि बँकिंग सेवा ग्रामीण भागात अधिक सक्षम होणे, या बाबींवर नवनिर्वाचित संचालकांनी भर द्यावा, अशी मागणीही पुढे येत आहे.

विजयाचा जल्लोष नव्हे, विकासाचा संकल्प

सत्कार सोहळ्याला सामाजिक भानाची जोड देण्यात आली असून, सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता हार, तुरे, पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत, असा निर्णय सत्कार समितीने घेतला आहे. त्यामुळे हा सोहळा केवळ विजयाचा गौरव न राहता, तालुक्याच्या विकासासाठी नवनिर्वाचित संचालकांसमोर अपेक्षांचे व्यासपीठ ठरणार आहे. महागाव तालुक्याला जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर प्रथमच एकाच वेळी चार प्रतिनिधी मिळाल्याने या संधीचे रूपांतर ठोस विकासकामांत आणि शेतकरीहिताच्या निर्णयांत व्हावे, अशीच तालुकावासीयांची अपेक्षा आहे.

Related posts

महागाव पोलिसांचा विद्यार्थी सुरक्षा व पोलीस भरती मार्गदर्शनाचा दुहेरी उपक्रम

चिलगव्हाण येथे अन्नत्याग आंदोलन  

बँकेच्या अडेलतट्टू कारभारामुळे विधवा शेतकरी महिलेची फरफट

धर्मरक्षणासाठी दिव्य विशाल हिंदू संमेलन

Chief Editor Gajanan waghmare

रब्बी हंगामाला पुस प्रकल्पाचे पाणी मिळणार नाही !

Chief Editor Gajanan waghmare

पोलीस शिपाई पदावर निवड झालेल्या तरुणांचा व पालकांचा सत्कार

Leave a Comment