लोकचिंतन

६ तासांत ३० जणांचे तोडले लचके 

४ गंभीर रुग्णांना यवतमाळला हलवले!

लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस

 

सोमवारी सकाळ उजाडली तीच मुळी एका भयानक दहशतीचा थरार घेऊन! महागाव तालुक्यातील गुंज, मोरथ, धारमोहा, माळकीन्ही, वाघनाथ आणि बोथा या पाच ते सहा गावांमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने जीवघेणा धुमाकूळ घातला. समोर दिसेल त्या नागरिकाच्या पोटरीचा अन पाठीचा लचका तोडला. अवघ्या काही तासांत या पिसाळलेल्या कुत्र्याने किमान ३० हून अधिक नागरिकांचे लचके तोडले. या घटनेमुळे संपूर्ण तालुका हादरला असून पाचही गावांत चिमुकल्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण घराचे दरवाजे लावून दहशतीखाली जगण्यास मजबूर झाले आहेत.

सवना ग्रामीण रुग्णालय रुग्णांनी तुडूंब, ४ जणांची प्रकृती चिंताजनक!

 

श्वानदंशानंतर जखमींचे आक्रंदन आणि नातेवाईकांचा आक्रोश सुरू झाला, यामुळे सवना येथील ग्रामीण रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. दिवसभरात तब्बल २२ जखमींवर सवना रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर उर्वरित जखमींनी खाजगी रुग्णालयात धाव घेतली. हल्ल्याची तीव्रता इतकी भयानक होती की संतोष पुकळे, शेख इम्रान शेख जफर, दर्शना तदे आणि अन्य एका गंभीर जखमीची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात (जीएमसी) रेफर करण्यात आले आहे. तसेच गुंज येथील चार वर्षांच्या आर्यन लहाने या चिमुकल्याची प्रकृती बिघडल्याने त्यालाही यवतमाळला हलवण्यात आले आहे.

कुत्रा अजूनही मोकाट

 

सर्वात संतापजनक बाब म्हणजे, ३० हून अधिक लोकांना चावा घेणारा पिसाळलेला कुत्रा अद्यापही मोकाट फिरत आहे. घटना घडल्यानंतर तहसीलदार अभय मस्के यांनी ‘सूचना’ जारी केल्या आहेत. पण प्रत्यक्षात कुत्रा पकडण्यात प्रशासनाला आद्याप यश आले नाही.

 

सवना रुग्णालयात उपचार घेतलेले रुग्ण

अभिषेक बोरकर (२३), राज बहादुरे (३०), निर्मला अगोस्कर (२५), प्रवीण मदने (२६), सजन काळे (५१), वैभव खंदारे (२९), सटवा कांबळे (५०), सम्यक वंजारी (२०), ज्योती खंदारे (१८), रमेश गव्हाणे (४१, बोथा), पल्लवी राठोड (२८, बिटरगाव), संतोष पुकळे (३४, गुंज), धनराज झोनबाळकर (३४, वेणी) आणि शेख इम्रान शेख जफर (३२, गुंज).

निष्काळजीपणा पडेल महागात, अँटी रेबीज लस महत्वाची

 

कुत्रा, मांजर किंवा पिसाळलेला कोणताही प्राणी चावल्यानंतर होणारा ‘रेबीज’ (Rabies) हा आजार अत्यंत घातक आणि प्राणघातक मानला जातो. वैद्यकीय शास्त्रानुसार, एकदा का रेबीजचे लक्षणे शरीरात दिसू लागली की, त्यावर जगात कोणताही उपाय उरत नाही आणि रुग्णाचा मृत्यू शंभर टक्के निश्चित असतो. परंतु, योग्य वेळी घेतलेली अँटी-रेबीज व्हॅक्सीन (ARV) आणि योग्य प्रथमोपचार यामुळे या आजाराला पूर्णपणे रोखता येते.

रेबीज म्हणजे काय आणि तो कसा पसरतो?

 

रेबीज हा ‘रेब्डोव्हायरस’ (Rhabdovirus) नावाच्या विषाणूमुळे होतो. पिसाळलेल्या प्राण्याच्या लाळेमध्ये हे विषाणू असतात. जेव्हा असा प्राणी माणसाला चावतो, ओरबाडतो किंवा माणसाच्या उघड्या जखमेवर लाळ लावतो, तेव्हा हे विषाणू मज्जासंस्थेद्वारे (Nervous System) थेट मेंदूपर्यंत पोहोचतात. जखम स्वच्छ धुणे: कुत्रा किंवा कोणताही प्राणी चावल्यास ती जागा तातडीने वाहत्या पाण्याखाली साबणाने किमान १५ मिनिटे स्वच्छ धुवावी. यामुळे प्राण्याच्या लाळेतील विषाणूंचे प्रमाण ८०% पर्यंत कमी होते. जखमेवर मिरची, हळद, चुना, किंवा कोणतेही गावरान औषध अजिबात लावू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जखमेवर घट्ट पट्टी बांधू नये किंवा टाके घालू नयेत. प्राणी चावल्यानंतर विषाणू मेंदूपर्यंत पोहोचण्याआधी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणे आवश्यक असते, त्यासाठी Anti-Rabies Vaccine (ARV) दिली जाते. सामान्यतः कुत्रा चावल्यानंतर एकूण ४ ते ५ डोस दिले जातात.

 रेबीज इम्युनोग्लोब्युलिन (RIG) उपचार

 

जर चावा खूप खोल असेल, रक्ताचा स्राव जास्त असेल किंवा जखम मान, चेहरा, हाताच्या बोटांवर असेल (Category III), तर ARV सोबत Rabies Immunoglobulin (RIG) चे इंजेक्शन तातडीने जखमेच्या ठिकाणी देणे बंधनकारक असते. कुत्रा किंवा कोणताही मोकाट प्राणी चावल्यास त्याकडे किरकोळ जखम म्हणून दुर्लक्ष करू नका. अंधश्रद्धेला बळी न पडता किंवा मंत्र-तंत्राच्या नादाला न लागता तात्काळ जवळच्या सरकारी किंवा ग्रामीण रुग्णालयात जाऊन ‘अँटी-रेबीज’ (ARV) लस पूर्ण करून घ्या. सर्व शासकीय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये ही लस मोफत उपलब्ध असते.

Related posts

यवतमाळ जिल्ह्यात नवीन विहीर-बोअरवेल खोदण्यावर निर्बंध

Chief Editor Gajanan waghmare

महागाव नगरपंचायत अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल 

Chief Editor Gajanan waghmare

लोणार येथील दैत्यसुदन मंदिर- मध्ययुगीन वास्तुकलेचा अद्वितीय नमुना

हिंगोलीत ४.७ रिश्टरचा भूकंप

बाटली आडवी झाली हो…!

उपद्रवी लोकांना कारवाईचे “टेरामायसीन” देणार !

Leave a Comment