लोकचिंतन

 

धनशक्ती हरली, महिला शक्ती जिंकली

 

प्रभाग क्रमांक १ मधील महिलांचा लढा यशस्वी

दीड महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या देशी दारू दुकान व वाईन बार संदर्भातील वादग्रस्त प्रश्नाचा अखेर निकाल लागला असून, धनदांडग्यांच्या सर्व कटकारस्थानांवर मात करत महिला शक्तीने या लढाईत दणदणीत विजय मिळविला आहे. प्रभाग क्रमांक १ मधील देशी दारूचे दुकान आणि वाईन बार बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने निर्गमित केले आहेत. या प्रभागातील देशी दारू दुकानाचे भवितव्य ठरविण्यासाठी घेण्यात आलेले महिलांचे मतदान सदोष मतदार यादीच्या आधारे पार पडल्याचा गंभीर मुद्दा समोर आला होता. या यादीत तब्बल पाच मयत महिला मतदारांसह तीन दुबार नावे असलेल्या महिला मतदारांचा समावेश असल्याचे उघड झाले. याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल तहसीलदार अभय मस्के यांनी जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडे सादर केला होता. देशी दारू दुकानाचा “करेक्ट कार्यक्रम” होणार आणि प्रभाग क्रमांक १ मध्ये अखेर बाटली आडवी होणार, अशी भविष्यवाणी साप्ताहिक लोकचिंतनने यापूर्वीच केली होती. ती आज अक्षरशः खरी ठरली आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये नव्याने सुरू करण्यात आलेले देशी दारूचे दुकान आणि त्यालगत असलेला वाईन बार बंद करण्यासाठी नगरसेविका जयश्री नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी तीव्र लढा उभारला होता. राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा प्रशासन आणि नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने १६ एप्रिल रोजी ‘उभी की आडवी बाटली’ याचा फैसला करण्यासाठी महिलांचे मतदान घेण्यात आले होते. मतमोजणीनंतर आडव्या बाटलीच्या बाजूने ६९ मते, उभ्या बाटलीच्या बाजूने ७ मते तर एका मतावर अंगठ्याचा ठसा असल्याने ते मत बाद ठरविण्यात आले. त्यानंतर मतमोजणी अधिकाऱ्यांनी अंतिम निर्णयासाठी अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. प्रभाग क्रमांक १ मधील मतदार यादीत एकूण १४५ महिलांची नावे होती. त्यापैकी ७७ महिला प्रत्यक्ष मतदानासाठी केंद्रावर उपस्थित राहिल्या. यामध्ये ६९ महिलांनी आडव्या बाटलीच्या बाजूने, तर ७ महिलांनी उभ्या बाटलीच्या बाजूने मतदान केले. एक मत अवैध ठरले. एकूण मतदार संख्येच्या ५० टक्के म्हणजे किमान ७३ मते आडव्या बाटलीच्या बाजूने पडणे आवश्यक असल्याने, ६९ मतांवर दारू दुकाने बंद होणार नाहीत, असा प्रचार काही ‘निष्ठावान कार्यकर्त्यांनी’ सुरू केला होता. मात्र, मूळ मतदार यादीच सदोष असल्याचा आरोप नगरसेविका जयश्री नरवाडे यांनी करत जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले होते.

 

जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आणि तहसीलदारांचा अहवाल ठरला निर्णायक

 

 मतदान प्रक्रिया राबविताना सदोष मतदार यादी वापरण्यात आली काय, तसेच यादीतील मयत व दुबार महिला मतदारांची संख्या किती आहे, याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी तहसीलदारांना दिले होते.

यानंतर बीएलओमार्फत करण्यात आलेल्या पडताळणीत मतदार यादीतील पाच महिला मतदार मयत असल्याचे, तर तीन महिला मतदारांची नावे दुबार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर अहवाल सादर केला. या आठ मतदारांची नावे वगळल्यानंतर मतदार यादीतील एकूण संख्या १३७ वर आली. त्यानुसार ५० टक्के मतदानाचा निकष गृहीत धरल्यास आडव्या बाटलीच्या बाजूने ६९ मते पुरेशी ठरत होती. मतदानात नेमकी ६९ मते आडव्या बाटलीच्या बाजूने पडल्याने जिल्हाधिकारी दारू दुकानांवर कारवाई करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर ती शक्यता खरी ठरली असून जिल्हा प्रशासनाने देशी दारू दुकान आणि वाईन बार सील करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दारूबंदीच्या लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या महिलांना संबंधित आदेशपत्र सुपूर्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. महिलांच्या एकजुटीपुढे धनशक्ती नमली आणि प्रभाग क्रमांक १ मध्ये अखेर ‘बाटली आडवी’ झाली, अशी प्रतिक्रिया आता सर्वत्र उमटत आहे.

Related posts

जंतर-मंतर येथील घटनेच्या निषेधार्थ महागावात शुक्रवारी रस्ता रोको

Chief Editor Gajanan waghmare

१२ नगरसेवक ‘नॉट रिचेबल’

Chief Editor Gajanan waghmare

अन्नदाता आणि आपली संवेदना

Chief Editor Gajanan waghmare

पंचायत समितीच्या आवारात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

गावठी पिस्टल बाळगणारा पुसदचा आरोपी महागावात सापडला

देशी दारू दुकानावरून स्थानिक नगरसेविकेचे मौन संशयास्पद

Leave a Comment