गुप्तधन काढणाऱ्या टोळीला शेतकऱ्यांनी बदडले
दहिसावळी येथे मध्यरात्री थरार
लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस
एका शेतात मध्यरात्रीच्या दरम्यान खड्डा खोदण्याचा व कुजबुजण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे शेतकरी तेथे पोहचले असता समोरचे दृश्य पाहून हादरले आणि अचंबित सुद्धा झाले. कीर्रर्र अंधारात जवळपास ७ ते ८ पुरुष आणि एक महिला मिळून शेतात गुप्तधनासाठी खड्डा खोदत असल्याचे दृश्य पाहून शेतकरी चक्रावले. त्यानंतर मात्र संतप्त शेतकऱ्यांनी या गुप्तधनाच्या शोधात आलेल्या अज्ञात भामट्यांचा येथेच्छ समाचार घेतला. शेतकऱ्यांचा मार वाचविण्या साठी त्या टोळीतील महिलेने बाजुच्या शेतातील ऊसात पळ काढला. काल सोमवारी रात्री १० ते सकाळी २ वाजताच्या दरम्यान महागाव तालुक्यातील दहिसावळी या गावातील एका शेतात हा थरारक प्रसंग घडला. या खळबळजनक प्रकरणाची परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. दहिसावळी येथील एका शेतमालकाला शेतात गुप्तधन असल्याचा साक्षात्कार झाला. हे गुप्तधन उकरून काढण्यासाठी त्याने दिग्रस येथील एका टोळीला पाचारण केले. काल रात्री ही टोळी शेतात दाखल झाली. पेट्रोल जवळपास सात ते आठ पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता. कीर्रर्र अंधारात या टोळीने शेतात पूजा मांडली. नारळ,हळद, कुंकू ,उदबत्ती, गुलाल,शेंदूर, निंबू , काळी बाहुली असा जामानिमा करून पूजा संपन्न झाली. त्यानंतर मोठ्या सब्बलाच्या मदतीने विशिष्ट ठिकाणी मोठा खड्डा खोदण्यात आला. शेतात खोदकाम सुरू असल्याचा आवाज निरव शांततेत इतर शेतकऱ्यांच्या कानी गेला. आजूबाजूच्या शेतात जागल करणारे शेतकरी या दिशेने धावले आणि समोरचे दृश्य पाहून जागीच खिळले. गुप्तधन करण्यासाठी टोळीकडून शेतात खोदकाम करण्यात येत असल्याचे दिसतात शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. काही शेतकऱ्यांनी ही माहिती मोबाईल वरून गावकऱ्यांना दिली. त्यानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला. त्यानंतर गुप्तधन काढणाऱ्या टोळीची चांगलीच धुलाई करण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमारास जवळपास चार तास हा थरार सुरू होता. गावकऱ्यांचा मार वाचविण्यासाठी गुप्तधन काढणाऱ्या टोळीतील भामटे गयावया करत होते. दरम्यान दहीसावळी येथील काही पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली. पोलिसात प्रकरण गेले तर आपल्याच गावातील शेतमालकाची बदनामी होईल यासाठी तक्रार देण्याचे टाळण्यात आले. त्यानंतर या टोळीची जमावाने सुटका केली. या खळबळजनक प्रकाराची आज संपूर्ण दहिसावळी परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती.
