लोकचिंतन
ताज्या घडामोडी

महागाव–गुंज रस्त्यावर पॅचवर्कचा महाघोटाळा पुसद बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराचा कळस ठेकेदार–अधिकाऱ्यांची संगनमताने लूट

महागाव–गुंज रस्त्यावर पॅचवर्कचा महाघोटाळा

पुसद बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराचा कळस

ठेकेदार–अधिकाऱ्यांची संगनमताने लूट

महागाव ते गुंज दरम्यानचा डांबरी रस्ता सध्या अक्षरशः गलीतगात्र अवस्थेत आहे. खड्ड्यांवर खड्डे आणि त्यावर तात्पुरत्या थिगळांची लिपापोती अशी या रस्त्याची विदारक अवस्था आहे. ‘रस्त्यात खड्डे आहेत की संपूर्ण रस्ताच खड्ड्यात आहे’ असा प्रश्न हा रस्ता पाहताच प्रवाशांना पडतो. हा रस्ता नव्याने, दर्जेदार पद्धतीने बांधण्याची नितांत गरज असताना, दरवर्षी पॅचेसच्या नावाखाली शासनाच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पुसद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील या मार्गावर सुरू असलेले पॅचवर्क हे भ्रष्टाचाराचा ढळढळीत नमुना ठरला आहे. अत्यंत सुमार दर्जाचे डांबर, गिट्टी व चुरी वापरून ‘पैसा वाचवा, पैसा जिरवा’ हा एककलमी कार्यक्रम राबविला जात आहे. प्रत्यक्ष बांधकामाचा दर्जा पाहिल्यानंतर या बोगस कामाची गुणवत्ता अधोरेखित होते. या संपूर्ण भ्रष्टाचारात ठेकेदार आणि अभियंत्यांचे उघड संगनमत असल्याचा आरोप होत आहे. गुंज ते फुलसावंगी या सुमारे २० किलोमीटर रस्त्याच्या डागडुजीसाठी तब्बल १ कोटी रुपयांचे पॅचवर्क कंत्राट मंजूर करून घेण्यात आले. यात काही कंत्राटदारांना पोसायचे आणि त्यात हिस्सेवाटप करून आपलेही खिसे भरायचे असा अधिकाऱ्यांचा डाव आहे. मात्र या कंत्राटातून प्रत्यक्षात रस्त्याची स्थिती सुधारण्याऐवजी ठेकेदार व काही अभियंत्यांनी ‘मोठा हात’ मारल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. पॅचवर्कचा दर्जा पाहताच हा भ्रष्टाचार उघड होतो. २०१९ पासून महागाव–गुंज हा रस्ता प्रवासायोग्य राहिलेला नाही. त्यामुळे सर्व खासगी प्रवासी वाहतूक महागाव–खडका–शिरपूर–गुंज या पर्यायी मार्गाने पुसदकडे वळवावी लागत आहे. वापरात नसलेल्या रस्त्यावर दरवर्षी पॅचेसच्या नावाखाली लाखो रुपये हडप करण्याचा धंदा पुसद बांधकाम विभागाने ठेकेदारांच्या मदतीने सुरू केला आहे. या संपूर्ण ‘गौडबंगालाची’ उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच गुणवत्ता नियंत्रण विभागाने पॅचवर्कची तातडीने पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व दोषी ठेकेदाराला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, अशीही मागणी जोर धरत आहे. महागाव ते गुंज दरम्यान सुरू असलेल्या पॅचेसच्या निकृष्ट कामातील भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी करण्यासाठी लवकरच तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Related posts

पंचायत समितीच्या आवारात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सायबर फसवणूक रोखण्यासाठी जागरूकतेची गरज !

Chief Editor Gajanan waghmare

४८ तासानंतरही पोलीसांना आरोपी सापडेना 

ट्रान्सफॉर्मरला शॉर्टसर्किटमुळे आग

Chief Editor Gajanan waghmare

शेणंद गावात ७० टक्के नागरिकांना अज्ञात तापा चा विळखा

Chief Editor Gajanan waghmare

पोखरी घाटात निलगायीची निर्घृण शिकार

Chief Editor Gajanan waghmare

Leave a Comment