लोकचिंतन न्यूज पोर्टल जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारे व्यासपीठ ठरेल – गणेश भोयर
लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस
मागील तीन वर्षांपासून निर्भीड, निःस्पृह व निपक्ष पत्रकारितेची ओळख निर्माण करणाऱ्या साप्ताहिक लोकचिंतन वृत्तपत्राने महागाव तालुक्यासह संपूर्ण जिल्हा आणि विदर्भात नावलौकिक मिळविला आहे. या पत्रकारितेची परंपरा अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने लोकचिंतन न्यूज पोर्टलचा शुभारंभ मराठी पत्रकार दिनाच्या औचित्याने करण्यात आला. हे न्यूज पोर्टल जनसामान्यांच्या प्रश्नांना निश्चित न्याय देणारे प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास महागाव तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष गणेश भोयर यांनी व्यक्त केला.
मराठी पत्रकार दिनानिमित्त येथील विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार संजय भगत अध्यक्षस्थानी होते. माजी उपनगराध्यक्ष उदय नरवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या अनुसूचित जाती विभागाच्या उपाध्यक्ष प्रियंका बिडकर, तसेच मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक निलेश पाटील नरवाडे मंचावर उपस्थित होते.
गणेश भोयर म्हणाले की, लोकचिंतन न्यूज पोर्टलच्या माध्यमातून शोषित, पीडित, वंचित, उपेक्षित आणि अन्यायग्रस्त समाजघटकांच्या जीवनातील समस्या प्रभावीपणे मांडल्या जातील. सत्य, सामाजिक बांधिलकी आणि लोकहित हेच या पोर्टलचे प्रमुख सूत्र राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात संजय भगत यांनी सांगितले की, मराठी पत्रकार दिनी न्यूज पोर्टलचा शुभारंभ होणे हा दुग्धशर्करा योग आहे. साप्ताहिक लोकचिंतनचे संपादक गजानन वाघमारे यांनी आपल्या अभ्यासू आणि निर्भीड पत्रकारितेतून जनतेसमोर आदर्श निर्माण केला असून, हीच बुलंद पत्रकारिता न्यूज पोर्टलच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात अनुभवता येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास महागाव तालुक्यासह विविध राष्ट्रीय व प्रादेशिक वृत्तपत्रांचे मान्यवर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
