ईटीएस मोजणीद्वारे कारवाई करणार
भोसा परिसरातील वादग्रस्त वाळूसाठ्याची प्रत्यक्ष पाहणी व ईटीएसद्वारे मोजणीची प्रक्रिया सुरू केल्यानंतर उपोषणकर्ते प्रदीप पाटील जगताप यांनी अखेर आपले आमरण उपोषण मागे घेतले. सायंकाळी सुमारे ८ वाजता तहसीलदार अभय मस्के आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सरबत पिऊन त्यांनी उपोषणाची सांगता केली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर पडदा पडला असून, तहसील प्रशासन आणि उपोषणकर्त्यांमधील तणावही पूर्णतः निवळला आहे. भोसा येथील गायरान जमिनीवर लाखो ब्रास वाळूचा अवैध साठा करण्यात आल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रदीप जगताप यांनी १७ जूनपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनादरम्यान त्यांनी काही काळ तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बैठा सत्याग्रहही केला होता. त्यामुळे कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार महसूल विभागाकडून पोलिसांत देण्यात आली होती. त्यानंतर जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपोषणकर्त्यावर कारवाई झाल्याने प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होऊ लागली होती. वाढता तणाव लक्षात घेऊन तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन आणि उपोषणकर्त्यांमध्ये सामोपचाराची भूमिका घेण्यात आली. प्रशासनाने दाखल केलेली तक्रार मागे घेतल्याने गुन्हे खारीज झाले आणि वातावरण निवळले. त्यानंतर जगताप यांनी मुख्य प्रवेशद्वारावरील आंदोलन हटवून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू ठेवले होते. दरम्यान, उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागणीची दखल घेत तहसील प्रशासनाने आज भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन वादग्रस्त वाळूसाठ्याची कसून चौकशी केली. साठवून ठेवलेला वाळूसाठा प्रशासनाने पूर्वी नमूद केलेल्या अंदाजाप्रमाणे सुमारे दीड हजार ब्रास आहे की त्यापेक्षा अधिक, याची खातरजमा करण्यासाठी ईटीएस मोजणी करण्याचे निश्चित करण्यात आले. या प्रक्रियेमुळे उपोषणकर्त्यांचे समाधान झाले. तहसील प्रशासनाने विषय गांभीर्याने हाताळत प्रत्यक्ष पाहणी करून मोजणी करण्याचे ठरविल्याने आंदोलनाचा मार्ग मोकळा झाला. सायंकाळी उशिरा तहसीलदार अभय मस्के, पोलीस अधिकारी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदीप जगताप यांनी सरबत घेऊन उपोषण मागे घेतले. मात्र, ईटीएस मोजणीचा अंतिम अहवाल काय येतो आणि वाळूसाठ्याबाबत पुढे प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे आता भोसा परिसरासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

