तीन वर्षीय बालकाचा मृत्यू
आरोग्य यंत्रणा सतर्क
साप्ताहिक लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस
महागाव तालुक्यातील शेणंद गावात मागील चार दिवसांपासून तापाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून, तीन वर्षीय बालकाचा तापानंतर मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. रुद्रांश राहुल पवार असे मृत बालकाचे नाव आहे. दरम्यान, गावातील सुमारे ७० टक्के नागरिक तापाने आजारी असल्याचा प्राथमिक अहवाल ग्रामविकास अधिकाऱ्यांनी तहसीलदार अभय मस्के यांच्याकडे सादर केला असून एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडल्याने गावात भीतीचे वातावरण आहे. अज्ञात तापाचे अजून निदान होत नसल्याने आरोग्य यंत्रणेसमोर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. रुद्रांश याला गुरुवारी ताप आल्याने उपचारासाठी महागाव येथील डॉ. निलपवार यांच्याकडे आणण्यात आले होते. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने तो दिवसभर खेळत होता, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. मात्र, सायंकाळच्या सुमारास त्याला पुन्हा तीव्र ताप आला. प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीय त्याला पुढील उपचारासाठी पुसद येथे घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शेणंद गावातील तापाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील चार दिवसांत तापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात येत असून, गावातील परिस्थितीबाबत ग्रामविकास अधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे प्राथमिक अहवाल सादर केला आहे. गावातील मोठ्या संख्येने नागरिक तापाने त्रस्त असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
डासांच्या अळ्या आढळलेल्या ठिकाणी उपाययोजना
परिस्थितीची दखल घेत आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. तालुका आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेणंद येथे कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणादरम्यान डासांच्या अळ्या आढळलेल्या पाणी साठवणूक करणाऱ्या कंटेनरमध्ये टेमिफॉस द्रावण टाकण्यात आले. तसेच दूषित व साचलेले पाणी असलेले काही कंटेनर रिकामे करण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांना आठवड्यातून किमान एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन केले आहे. घराच्या परिसरात पाणी साचणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टाकाऊ वस्तू, जुने टायर, कुंड्या तसेच इतर साहित्यामध्ये पाणी साचल्यास डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असल्याने अशा वस्तूंची योग्य विल्हेवाट लावण्याचे आवाहन करण्यात आले
तापाचे कारण शोधण्यासाठी रक्तनमुने
गावातील तापाच्या रुग्णांचे रक्तनमुने घेण्यात आले असून, तापाचे नेमके कारण शोधण्यासाठी त्यांची तपासणी सुरू आहे. तसेच सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे जलशुद्धीकरण जलसुरक्षकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. जलजन्य व कीटकजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले. दरम्यान, तीन वर्षीय बालकाचा तापानंतर झालेला मृत्यू आणि गावातील मोठ्या संख्येने नागरिक तापाने आजारी असल्याने शेणंदमध्ये आरोग्य विभागाने व्यापक सर्वेक्षण व तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. रक्तनमुना तपासणीचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर तापाचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

