महागाव ग्रामीण रुग्णालयावरील हल्ल्याने जिल्हा संतप्त
चार पथकांच्या घोषणेचा उपयोग काय?
आमदार किसनराव वानखेडे झोपले का ?
महागाव ग्रामीण रुग्णालयात महिला डॉक्टर, नर्सिंग ऑफिसर आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याला ४८ तास उलटून गेले, तरी एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. हल्लेखोरांनी रुग्णालयात घुसून धुडगूस घालत काचा-दरवाजांची तोडफोड केली, लोखंडी रॉडने मारहाण केली आणि महिला डॉक्टर व नर्सला जीव वाचविण्यासाठी बाथरूममध्ये लपून बसावे लागले. एवढी गंभीर घटना घडूनही आरोपी मोकाट फिरत असतील, तर कायदा-सुव्यवस्था नेमकी कुणाच्या हातात आहे? असा संतप्त सवाल आता महागावकरांसह संपूर्ण जिल्ह्यातून उपस्थित होत आहे. कळस म्हणजे विभागाचे आमदार किसनराव वानखेडे या गंभीर प्रकरणी मिठाच्या गुळण्या तोंडात धरून गप्प बसले आहेत. महागावात भेट देण्याचे तर दूरच त्यांना याप्रकरणी फोनवरही साधी माहिती घेतली नाही आणि कोणाचे सांत्वन करण्याचे सौजन्य दाखवले नाही त्यामुळे तालुका संतप्त झाला आहे. हल्लेखोर हे महागाव पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंबोडा येथील असल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटना घडल्याच्या रात्रीच पोलिसांनी अंबोडा परिसरात सर्च ऑपरेशन राबविले असते, तर हल्ल्यात सहभागी असलेल्या दहा ते बारा आरोपींच्या मुसक्या आवळणे पोलिसांना अवघड नव्हते. मात्र घटना घडल्यानंतर पोलिस डाराडूर झोपेत होते. पोलीसांची भूमिका नेमकी काय होती, याबाबतच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चार पथके नेमली, पण आरोपी कुठे?
घटनेनंतर आरोपींच्या शोधासाठी चार पथके गठीत केल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र ४८ तासांनंतरही एकही आरोपी अटक न झाल्याने या पथकांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चार पथके गठीत केल्याची घोषणा करून प्रत्यक्षात आरोपींना मोकाट सोडायचे असेल, तर या पथकांचा उपयोग तरी काय? असा सवाल संतप्त नागरिकांकडून केला जात आहे. रुग्णालयात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हल्ला झाल्यानंतर पहाटे चार वाजता गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. गंभीर स्वरूपाच्या हल्ल्याच्या प्रकरणात तक्रार नोंदविण्यास एवढा वेळ का लागला? घटनेनंतर तातडीने पोलिसांनी कोणती पावले उचलली? हल्लेखोरांच्या संभाव्य ठिकाणांवर तत्काळ छापे का टाकले गेले नाहीत? या प्रश्नांची उत्तरे पोलीस प्रशासनाने जनतेसमोर देणे गरजेचे आहे.
डॉक्टरांनी दवाखाने बंद केले; जिल्हा संतप्त
महिला डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटले आहेत. महागाव शहरातील सर्वच खासगी डॉक्टरांनी आपापले दवाखाने बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदविला. विविध संघटनांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदने सादर केली आहेत. रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी रात्रंदिवस सेवा देणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाच जर रुग्णालयात जीव मुठीत धरून काम करावे लागत असेल, तर सामान्य रुग्णांनी सुरक्षिततेची अपेक्षा कुणाकडून करायची? महिला डॉक्टर आणि नर्सिंग ऑफिसरला स्वतःचा जीव वाचविण्यासाठी बाथरूममध्ये लपावे लागणे हे भयंकर आहे.
विभागाचे आमदार झोपले आहेत का?
महागाव तालुक्याचा समावेश उमरखेड विधानसभा मतदारसंघात होतो. महागाव तालुक्यातील जनतेच्या मतदानातून आमदार झालेले किसनराव वानखेडे यांना या घटनेची माहिती पोहोचली नाही काय? दोन महिला डॉक्टर, नर्सिंग ऑफिसर आणि कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला होतो, रुग्णालयाची तोडफोड होते, डॉक्टरांना बाथरूममध्ये लपून जीव वाचवावा लागतो, संपूर्ण जिल्हा या घटनेने संतप्त होतो आणि महागाव शहरातील डॉक्टर दवाखाने बंद ठेवतात; तरीही मतदारसंघाचे आमदार गप्प का? जनतेच्या प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठविण्याची जबाबदारी असलेल्या आमदारांनी या गंभीर घटनेची तातडीने दखल घेऊन आरोपींच्या अटकेसाठी पोलीस प्रशासनावर दबाव आणणे अपेक्षित होते. मात्र आमदार किसनराव वानखेडे यांचे या प्रकरणातील मौन अनेक प्रश्न निर्माण करणारे आहे. मतदारसंघातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना लोकप्रतिनिधींच्या मौनाचे कारण काय? असा सवाल आता जनतेतून उपस्थित होत आहे.
तालुका बेवारस सोडला आहे का?
महागाव तालुक्यात एखादी गंभीर घटना घडली की नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय प्रशासन जागे होत नाही, अशी भावना दिवसेंदिवस बळावत आहे. रुग्णालयावर हल्ला होतो, आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण होते, डॉक्टरांना जीव वाचविण्यासाठी लपावे लागते आणि ४८ तासांनंतरही आरोपी मोकाट असतात, ही परिस्थिती प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. रुग्णांचे जीव वाचविणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा जीव कोण वाचवणार? आरोपी मोकाट आणि पोलीस प्रशासन झोपेत—हीच का महागावची कायदा-सुव्यवस्था? चार पथकांची घोषणा की आरोपींना अटक करण्याची प्रत्यक्ष कारवाई? या प्रश्नांची उत्तरे आता महागावकरांना हवी आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांवर हात उगारणाऱ्या हल्लेखोरांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, रुग्णालयात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त द्यावा, सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस सुरक्षा व्यवस्था उभी करावी, अशी मागणी जोर धरत असून अनेक सामाजिक संघटना उद्यापासून या प्रश्नावर रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती आहे.

