गणेशोत्सवानिमित्त शांतता समितीच्या सभेत ठाणेदारांचा इशारा
साप्ताहिक लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस
गणपती मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कायद्याची बूज राखणारे सुजाण नागरिक यांच्या सामंजस्यपूर्ण सहकार्यामुळे आजवर महागाव शहर आणि तालुक्यात धार्मिक दंगल किंवा सामाजिक वितंडवाद उद्भवला नाही. तालुक्याच्या या लौकिकाला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही उपद्रवी घटकांनी केलाच तर त्यांना सक्तीने कारवाईचे “टेरामायसीन” दिले जाईल, असा सज्जड इशारा महागाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी दिला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीला संबोधित करताना त्यांनी उत्सवाचा आनंद घेतानाच कायदा-सुव्यवस्थेचेही काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले. ठाणेदार वानखडे म्हणाले की, डीजे बंदीसाठी दोन याचिका आणि उच्च न्यायालयाने स्यू-मोटो दाखल करून घेतलेली एक याचिका, अशा तीन याचिका दाखल झाल्या. डीजेच्या कर्णकर्कश ध्वनी प्रदूषणाची दखल घेत न्यायालयाने डीजे बंदीचे आदेश दिले आहेत. पूर्वी म्युझिकल बँड, एक-दोन स्पीकर टॉपला स्थानिक पातळीवर आम्ही परवानगी देत असू; मात्र, आता त्यावरही कडक निर्बंध आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीत केवळ पारंपरिक वाद्यांनाच अनुमती असून, त्यासाठीही पोलीस प्रशासनाची परवानगी आवश्यक आहे. शहराच्या चौकात सकाळ, दुपार, संध्याकाळ व्हॉइस डेसिबलचे नमुने पोलीस प्रशासनाने घेतले. शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही मल्टी साऊंड सर्व्हिसला परवानगी देण्यात येणार नाही. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना व भक्तांना मिरवणुकीचे अप्रूप असते; मात्र, यात सामाजिक एकात्मता, शांतता व सुव्यवस्था राखली जावी, ही अपेक्षा आहे. वाद व अप्रिय घटना टाळण्यासाठी समितीच्या सदस्यांना व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना पोलीस मित्र म्हणून ओळखपत्र (ID) देण्यात येईल. तालुक्यातील आठ ते नऊ गावांत गणेश विसर्जनाच्या ठिकाणची पाहणी केली असता, तिथे कोणत्याही सुविधा नसल्याचे आढळले. तालुक्यात १८५ मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली असून, ६५ मंडळांनी परवानगी घेतली आहे. सर्वांसाठी ऑनलाइन परवानगी आवश्यक असून, ती रीतसर घ्यावी, असे आवाहन ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी केले.
नगरपंचायत प्रशासनाचे वाभाडे
ग्रामपंचायती परवडल्या, एवढी शहराच्या नगरपंचायतीची बकाल अवस्था आहे. स्थानिक पुढाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कायापालट करावा, अशी अपेक्षा ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी व्यक्त केली. विद्युत वितरणच्या भंगार कारभाराचा पाढा वाचताना, “यांच्यापुढे किती वेळा डोके फोडले, तरी विद्युत पुरवठ्याची समस्या सुटत नाही,” असा त्रागा ठाणेदारांनी व्यक्त केला.
पायातील जोडे हातात घेऊन नगरपंचायतीत यावे लागते – संभाजीराव नरवाडे
ठाणेदारांनी नगरपंचायतीची लक्तरे वेशीवर टांगल्याचा मुद्दा घेऊन ज्येष्ठ नेते तथा नगरसेवक संभाजीराव नरवाडे यांनी नगरपंचायत प्रशासनाच्या भिकारावस्थेवर तोफ डागली. नगरपंचायत कार्यालयाच्या दारापुढे मोठा डोह साचतो. “पायातील जोडे हातात घेऊनच सभागृहात जावे लागते,” अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी करताच सभेत एकच हशा पिकला. अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेतला तर लोकांची मने दुखतात. “पुन्हा मत मागायला या, मग तुम्हाला दाखवतो,” असा दम दिला जातो. सहन होत नाही आणि सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. शहरात ५० वर्षांपासून धार्मिक सलोख्याने गणेशोत्सव साजरा केला जातो. ही परंपरा निश्चित जपली जाईल, असा शब्द संभाजीराव नरवाडे यांनी दिला.
खड्ड्यांमुळे गणेश विसर्जनात बाधा आली तर मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार धरा – संजय भगत
गणपती विसर्जनाच्या मिरवणूक मार्गातील खड्डे बुजवून रस्ता प्रशस्त करण्याची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. खड्ड्यांमुळे गणेशमूर्तीचे नुकसान झाल्यास किंवा दंगाफसाद झाल्यास मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, अशी नोटीस पोलीस प्रशासनाने द्यावी, अशी सूचना पत्रकार संजय भगत यांनी केली. सामाजिक भान राखत प्रशासन हाताळत असल्याबद्दल संजय भगत यांनी ठाणेदार वानखडे यांची प्रशंसा केली.
विकासाच्या एकेका परवानगीला दहा-दहा महिने लागतात – प्रमोद भरवाडे
निवडून येताच अमुक-अमुक विकासकामे मार्गी लावण्याची उर्मी माझ्यात होती; परंतु प्रत्यक्षात सिस्टीम भ्रमनिरास करणारी आहे. विकासकामाच्या एकेका परवानगीला दहा-दहा महिने लागतात. या विलंबामुळे विकासकामे ठप्प होतात, अशी कबुली उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे यांनी दिली. गणपती विसर्जनाच्या ट्रॅक्टरवर गणपतीचा मखर व आरास वाहनाच्या खूप बाहेर जाणार नाही, याची काळजी घेतली तर पारंपरिक मार्गावर विनाअडथळा मिरवणूक पार पडेल, असे त्यांनी सांगितले.
२५ की २७ सप्टेंबर? विसर्जनाच्या तारखेचा तिढा
रविवार, २७ सप्टेंबर रोजी महागाव शहरातील गणपती विसर्जन व्हावे, अशी बहुतांश मंडळांची मागणी आहे. प्रशासनाने मात्र शुक्रवार, २५ सप्टेंबर हा मुहूर्त निश्चित केला आहे. मंडळांचे पदाधिकारी व प्रशासनाच्या समन्वयातून विसर्जनाची तारीख निश्चित केली जाईल. यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची परवानगी घेऊन तोडगा काढू, अशी हमी ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी दिली. ज्येष्ठ नगरसेवक रामराव पाटील नरवाडे आणि माजी उपनगराध्यक्ष सुरेश पाटील नरवाडे यांनीही मनोगत व्यक्त करीत काही सूचना प्रशासनापुढे मांडल्या. शांतता सभेला गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

