अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल
लोकचिंतन न्यूज एक्स्प्रेस
महागाव तालुक्यातील आमणी (खुर्द) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त लावण्यात आलेल्या बॅनरची अज्ञात व्यक्तींकडून विटंबना करण्यात आली. या संवेदनशील प्रकरणात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २९८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल ८ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आमणी (खुर्द) येथे आंबेडकर जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर अज्ञात इसमाने दगड मारून तो फाडल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे स्थानिक बौद्ध आणि बहुजन समाजाच्या भावना दुखावल्याआहेत. या प्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्ठान मंडळ संघर्ष समितीचे अध्यक्ष गजानन रोकडे यांनी काल रात्रीच महागाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अंबुरे करीत आहेत. दरम्यान, गावातील आशिष दिलीप काळबांडे, अतुल शेषराव रोकडे, प्रशांत प्रमोद मोरे, सुरज नारायण सांगडे आणि सम्यक राधेश्याम काळबांडे आदींसह नागरिकांनी काल रात्रीच पोलीस ठाण्यात जाऊन घटनेचा निषेध नोंदविला व संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी खबरदारीची पावले उचलली आहेत. आरोपीचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती ठाणेदार धनराज निळे यांनी दिली.
आमणीच्या सामाजिक एकोप्याला गालबोट
आमणी (खुर्द) येथे मुख्यतः दलित,बहुजन समाजातील नागरीकांचे वास्तव्य आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या शुभेच्छापर बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू’ फुले, आंबेडकर यांच्यासह सर्व परिवर्तनवादी महापुरुषांच्या प्रतिमा होत्या. भीम जयंतीला आठवडाभराचा अवधी शिल्ल्लक असताना या बहुजन नायकांच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी गावातील आंबेडकरी अनुयायींनी शुभेच्छा संदेश देणारे बॅनर लावले होते. या बॅनरची विटंबना करण्यात आल्याने दलित- बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. आमणी । (खुर्द) येथे जातीय तेढ निर्माण होईल अशी एकही घटना आजपर्यंत घडली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पृष्ठभूमीवर बॅनर विटंबनेचा निंदनीय प्रकार समोर आल्यामुळे सामाजिक एकात्मतेच्या भावनेला तडा गेला आहे. दरम्यान आमणी (खुर्द) येथील आंबेडकरी अनुयायांनी आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढली आणि अभिवादन केले.

