लोकचिंतन

 

तीनही शिक्षिका अनुपस्थित

 

संतप्त पालकांचा विद्यार्थिनींसह पंचायत समितीवर मोर्चा

 

लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस

 

सवना येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेतील शिक्षणव्यवस्था पूर्णतः कोलमडली असून, शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिकेसह तिन्ही शिक्षिका अनुपस्थित असल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला. परिणामी एक ते चार वर्गातील विद्यार्थिनींचे शैक्षणिक भवितव्य अक्षरशः अंधारले असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे शाळेचा कारभार पूर्णपणे रामभरोसे असल्याचा आरोप पालक वर्गातून होत आहे. प्रभारी मुख्याध्यापिका सरोजा वंजारी या गेल्या तब्बल तीन महिन्यांपासून वैयक्तिक कारणास्तव दीर्घ रजेवर आहेत. आधीच शिक्षकांचा तीव्र अनुशेष असताना, शाळेतील एक शिक्षिका कार्ला ता.पुसद येथे प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आली. उर्वरित केवळ एकमेव शिक्षिकेच्या भरोशावर चार वर्गांचे अध्यापन कसेबसे सुरू होते. मात्र आज बुधवारी ती एकमेव शिक्षिकाही शाळेत गैरहजर राहिल्याने शाळेत एकही शिक्षिका उपस्थित नव्हती. शाळेत शिक्षिका नसल्याने नियमित वेळेत आलेल्या विद्यार्थिनींची मोठी गैरसोय झाली. चिमुकल्या विद्यार्थिनी शाळेच्या आवारात खिचडी शिजविणाऱ्या महिलांच्या आसपास बसून वेळ काढत असल्याचे विदारक चित्र दिसून आले. ही बाब पालकांच्या निदर्शनास येताच संतप्त पालकांचा उद्रेक झाला. तात्काळ पालकांनी शाळेकडे धाव घेतली. शाळेत एकही शिक्षिका उपस्थित नसल्याचे प्रत्यक्ष पाहताच पालकांचा पारा चढला. यानंतर संतप्त पालकांनी विद्यार्थिनींना सोबत घेत थेट महागाव पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला. गटविकास अधिकारी कदम यांच्या दालनात धडक देत पालक व विद्यार्थिनींनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, सवना ग्रामपंचायतीने यापूर्वीच २१ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत स्वतंत्र ठराव मंजूर करून, सवना येथील प्राथमिक कन्या शाळेत तातडीने नवीन शिक्षिका प्रतिनियुक्तीवर देण्यात यावी किंवा बदलीद्वारे कायमस्वरूपी शिक्षिका नियुक्त करावी, अशी मागणी केली होती. मात्र महागाव गट शिक्षण विभागाने या ठरावाकडे साफ दुर्लक्ष करत केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम केले. परिणामी प्रशासनाच्या उदासीनतेचा फटका थेट चिमुकल्या विद्यार्थिनींना बसत आहे. शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे सवना येथील प्राथमिक कन्या शाळेतील विद्यार्थिनींचे शैक्षणिक भवितव्य संकटात सापडले आहे. तात्काळ शिक्षिकांची नियुक्ती केली नाही, तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त पालकांनी दिला आहे.

Related posts

आमणीतील अवैध दारूचा कहर: २० हातभट्ट्या पेटल्या

Chief Editor Gajanan waghmare

लोणार येथील दैत्यसुदन मंदिर- मध्ययुगीन वास्तुकलेचा अद्वितीय नमुना

चिलगव्हाण येथे अन्नत्याग आंदोलन  

महागाव नगरपंचायत अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल 

Chief Editor Gajanan waghmare

शेतातील गोठ्याला आग

Chief Editor Gajanan waghmare

पाचशे वर्षांची परंपरा जपणारे गौळ राऊतवाडीचे श्री हनुमान मंदिर

Chief Editor Gajanan waghmare

Leave a Comment