लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस
महागाव शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये सुरू होणाऱ्या देशी दारू दुकानाविरोधात संपूर्ण शहर पेटून उठले असताना, याच प्रभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपाच्या नगरसेविकेने अद्याप मौन बाळगल्याने नागरिकांमध्ये संशय आणि तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महिलांचा रोष, आंदोलन आणि प्रशासनावर वाढता दबाव असतानाही नगरसेविकेची चुप्पी अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. विशेष म्हणजे, देशी दारू दुकान बंद व्हावे यासाठी भाजपाचेच माजी आमदार नामदेवराव ससाने प्रत्यक्ष मैदानात उतरले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतः उपस्थित राहून अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. मात्र, ज्या प्रभागात हे दुकान सुरू होत आहे त्या प्रभागाच्या नगरसेविकेने जाहीर भूमिका न घेतल्याने जनतेत नाराजी पसरली आहे.
___________________________
‘माय माऊल्या लढाईसाठी सज्ज
देशी दारू दुकानाविरोधात प्रभाग क्रमांक १ मधील महिलांनी संघटित होत एल्गार उभारला आहे. नगरसेविका जयश्री संजय नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढत देशी दारू दुकानाची परवानगी तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.
महागाव शहराच्या मुख्य बाजारपेठेतील बेलपत्रे कॉम्प्लेक्सच्या तळघरात शुक्रवार, २३ जानेवारी २०२६ पासून देशी दारू दुकान सुरू करण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. शाळा, बस थांबा, बँका हाकेच्या अंतरावर या दारू दुकानाच्या अगदी जवळ मुलींची शाळा, बस थांबा, युनियन बँक, गोदावरी अर्बन बँक व जिजाऊ अर्बन बँकेच्या शाखा तसेच खासगी दवाखाने आहेत. दररोज शेकडो विद्यार्थिनी व महिला या मार्गावरून ये-जा करतात. आधीच जवळील वाईन बारमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी आता आणखी एक देशी दारू दुकान सुरू झाल्यास महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होईल, असा इशारा दिला आहे. याच चौकात हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक यांचे तैलचित्र असून, येथे त्यांचा भव्य पुतळा उभारण्याचा प्रस्ताव आहे. अशा ठिकाणी मद्यविक्रीस परवानगी देणे म्हणजे महागावच्या सांस्कृतिक अस्मितेवर आघात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणात अधिक गंभीर बाब म्हणजे, संबंधित भाजपाच्या नगरसेविकेचे पती हे भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष व प्रभावी कार्यकर्ते आहेत. त्यामुळे नगरसेविकेच्या मौनाला वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. दरम्यान, काही लोकप्रतिनिधी वरवर विरोध दर्शवत असले तरी पडद्यामागून लाखोंची पानसुपारी घेऊन देशी दारू दुकानासाठी सहकार्य केल्याचा आरोपही जोर धरू लागला आहे.
महिलांच्या आंदोलनाला शहरभरातून पाठिंबा मिळत असून, प्रशासनाने तात्काळ देशी दारू दुकानाची परवानगी रद्द केली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा नगर सेविका जयश्री नरवाडे, माजी उपनगराध्यक्ष सुरेश नरवाडे, माजी नगराध्यक्ष करुणाताई शिरीबिरे, छायाताई नरवाडे, कविता नेवारे, अनिता गावंडे, बेबीताई गाडबैले, रेखा नैताम, अर्चना शिवरकर यांच्यासह आंदोलनकर्त्या महिलांनी दिला आहे.
______________________________
बाटली आडवी करण्यासाठी मतदानाची प्रक्रिया सुरू
देशी दारूची बाटली आडवी करण्यासाठी प्रशासनाकडून आता या प्रभागातील महिलांचे मतदान घेण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. विभागाचे अधिक्षक नितेश शेंडे यांनी आजच पुसद येथील निरीक्षकांना तातडीने सूचना देऊन मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी प्रभाग १ मधील रहिवासी महिलांची अद्ययावत मतदार यादी उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.

