लोकचिंतन

 

 

ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी

 

२७ जानेवारीपासून आमरण उपोषण

 

डोंगरगाव (ता. महागाव) येथील बौद्ध समाजातील दोन दलित शेतकरी कुटुंबांना त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन संपूर्णपणे भूमिहीन करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधितांवर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत, तसेच न्याय न मिळाल्यास २७ जानेवारीपासून महागाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुदस्सीर सय्यद जमाल यांनी दिला आहे. डोंगरगाव येथील विमल बबन हडसे आणि हिरामण शंकर हडसे या बौद्ध समाजातील शेतकऱ्यांची भोगवटदार क्रमांक दोनची जमीन एकत्र करून त्यांना नाममात्र मोबदला देण्यात आला. त्यानंतर ही जमीन तायरखा रहीमखा पठाण यांनी वैशाली श्रीकांत उपलेंचवार यांना विकली. विशेष म्हणजे, अल्पावधीतच हीच जमीन सुमारे दीड कोटी रुपयांना औरंगाबाद येथील जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला विकण्यात आली. या व्यवहारामध्ये गरीब, अशिक्षित आणि मागासवर्गीय शेतकरी कुटुंबांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत योजनाबद्ध फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी सय्यद मुदस्सीर सय्यद जमाल यांनी विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. दरम्यान, जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने डोंगरगाव येथील शेत सर्वे क्रमांक १३८ ( मधील ४ हेक्टर क्षेत्रात गिट्टी क्रशर खदान सुरू केली आहे. या प्रकल्पामुळे हिरामण हडसे व त्यांच्या कुटुंबीयांना पूर्णतः भूमिहीन व्हावे लागले असून, त्यांच्या उपजीविकेवर प्रतिकुल परिणाम झाला आहे. या मानसिक तणावामुळे शेतकरी हिरामण हडसे यांची प्रकृतीही खालावली आहे. न्यायालयीन व शासकीय पातळीवरील सर्व कारवाईसाठी हडसे कुटुंबीयांनी सय्यद मुदस्सीर सय्यद जमाल यांना अधिकृत मुखत्यारपत्र दिले असून, त्याआधारे ते कुटुंबाच्या वतीने लढा देत आहेत. संबंधित प्रकरणात शेतकऱ्यांना त्यांची जमीन परत मिळवून देण्यात यावी, तसेच गिट्टी क्रशर कंपनीचा कारखाना तात्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या शासकीय व निमशासकीय अधिकाऱ्यांसह खासगी व्यक्तींवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, २७ जानेवारी पासून महागाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Related posts

बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त आज राज्यस्तरीय आदर्श उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा

aadvaith46@gmail.com

महागाव नगरपंचायत अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल 

Chief Editor Gajanan waghmare

नव्या देशी दारू दुकानाचा राजकीय खलनायक कोण ?

Chief Editor Gajanan waghmare

१२ नगरसेवक ‘नॉट रिचेबल’

Chief Editor Gajanan waghmare

आमणीतील अवैध दारूचा कहर: २० हातभट्ट्या पेटल्या

Chief Editor Gajanan waghmare

देशी दारू दुकानावरून स्थानिक नगरसेविकेचे मौन संशयास्पद

Leave a Comment