काँग्रेसचे देऊळ पाण्यात?
महागाव नगरपंचायतीत राजकीय भूकंपाचे संकेत!
लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस
महागाव नगरपंचायतीत गुवाहाटी पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची प्रबळ शक्यता निर्माण झाली असून, सत्ताधारी काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. नगरपंचायत अध्यक्षा सुनंदा दिलीप सुरोशे (कोपरकर) यांच्या विरोधात उद्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अविश्वास प्रस्ताव दाखल होण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून तब्बल १२ नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ असून, हेच नगरसेवक उद्या अचानक जिल्हाधिकारी कार्यालयात हजर होऊन अविश्वास प्रस्ताव दाखल करणार, अशी जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे. त्यामुळे महागावच्या राजकारणात भूकंप येण्याची दाट शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हा संपूर्ण राजकीय खेळ उमरखेड सत्ताकेंद्राच्या सहकार्याने आखण्यात आला असून, गुवाहाटी पॅटर्नचे काटेकोर नियोजन सुरू आहे. “कामाख्या देवीचे १२ भक्त” अशी उपरोधिक उपमा दिलेले हे नगरसेवक उद्या थेट हायप्रोफाईल एंट्री करत अविश्वास प्रस्ताव दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे.नॉट रिचेबल असलेल्या नगरसेवकांमध्ये प्रामुख्याने भाजपाचे नगरसेवक गजानन सोपान साबळे,सुरेश उत्तमराव नरवाडे, सौ. रंजना दीपक आडे, आणि सौ. आशा शंकर बावणे. शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद उर्फ शाका भरवाडे,रामराव काशिनाथ नरवाडे, विशाल प्रकाश पांडे, सौ. सुनीता शिवाजी डाखोरे आणि सौ. करुणा नारायण शिरबिरे. सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक मो. परवेज शफी सुरैया,श्रीमती जयश्री अशोक इंगोले आणि सौ. जयश्री संजय नरवाडे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, उपनगराध्यक्ष प्रमोद उर्फ शाखा भरवाडे हे स्वतःच नगराध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी करणार असल्याची दाट शक्यता असून, त्यामुळे काँग्रेसच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान काँग्रेसचे नगरसेवक महेश पाटील यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असली तरी, उद्या आणखी दोन नगरसेवक यवतमाळ गाठून अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी करतील, अशीही जोरदार चर्चा आहे.
महागाव नगरपंचायतीच्या कार्यकाळाला अवघा एक वर्षही शिल्लक नसताना, काँग्रेसची सत्ता उलथवून टाकून भाजपाच्या नेतृत्वाखाली विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याचे नियोजन उमरखेड दरबारात आखल्याचे बोलले जात आहे. वादग्रस्त देशी दारू दुकानाला टाळे, गावात सकारात्मक संदेश आणि पुढील पाच वर्षांची सत्ता काबीज करण्याचा मास्टर प्लॅन तयार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, काँग्रेसची सत्ता वाचवण्यासाठी गटनेते शैलेश कोपरकर यांनी एडीचोटीचा जोर लावला असला, तरी यावेळी त्यांचे सर्व प्रयत्न सपशेल अपयशी ठरतील असा कयास राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

