लोकचिंतन

 

दृष्टी गेली, पण सुरांची दृष्टी लाभली

 

बँजो मास्टर’ जयदेव भद्रे यांचा अमृतमहोत्सवी सुरेल प्रवास

 

साप्ताहिक लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस

 

‘है अंधेरी रात, फिर भी रोशनी की बात कर…

लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर!’

डोळ्यांनी अंध असलेल्या जयदेव भद्रे यांच्या बोटांनी जेव्हा बँजोच्या मंद्र सप्तकातून तार सप्तकापर्यंतच्या तारा अलगद छेडल्या जातात, तेव्हा काळजाचे कान करून ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या ओठांवर नकळत दाद उमटते. अंधाराला नशिब मानून थांबण्याऐवजी त्याच अंधारातून सुरांची प्रकाशवाट निर्माण करणाऱ्या या हरहुन्नरी कलावंताचा जीवनप्रवास म्हणजे जिद्द, संघर्ष आणि कलेच्या अविरत साधनेची प्रेरणादायी कहाणी आहे. आज, १८ सप्टेंबर रोजी त्यांच्या अमृतमहोत्सवी पदार्पणानिमित्त त्यांच्या या सुरेल प्रवासाची उजळणी करणे अगत्याचे आहे. १८ सप्टेंबर १९५२ रोजी जन्मलेल्या जयदेव भद्रे यांना वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी देवीच्या आजारपणामुळे दृष्टी गमवावी लागली. त्यावेळी ते जेमतेम पहिलीत शिकत होते. डोळ्यांसमोरचा प्रकाश हरपला आणि शाळेचा प्रवास तेथेच थांबला; मात्र, जगाच्या विद्यापीठातून शिकण्याचा त्यांचा ‘डोळस’ प्रवास सुरू झाला. माणसे पारखण्याची दृष्टी, परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द आणि काहीतरी करून दाखविण्याची उमेद त्यांच्या मनात कायम जागी राहिली.

बुलबुलतरंगापासून बँजो मास्टरपर्यंत…

मोठे बंधू अंबादास भद्रे यांनी बाजारातून आणून दिलेल्या ‘बुलबुलतरंग’ वाद्याने त्यांच्या संगीतसाधनेची सुरुवात झाली. अल्पावधीतच त्यांच्या बोटांमध्ये सुरांची जादू अवतरली आणि बँजो वादनातील त्यांच्या प्रतिभेचे धुमारे फुटले. भजन, कीर्तन, नाटक आणि कलापथकातून बँजोची कला सादर करीत त्यांनी आपल्या वादनाची वेगळी ओळख निर्माण केली. पुढे ‘बँजो मास्टर’ म्हणून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. भाकरीचा प्रश्नही या संघर्षमय प्रवासाचा अविभाज्य भाग होता. धाकटी बहीण माया हिच्या गोड आवाजाची साथ आणि जयदेव यांच्या बँजोची सुरावट अशा भावंडांच्या जोडीने रस्त्यावर फिरून फिल्मी गीते सादर केली. त्यांच्या या सुरेल जुगलबंदीने अनेकदा श्रोत्यांचे कंठ दाटून आणले.

सुरांतून प्रबोधन, मनोरंजन आणि कलासाधना

मुड़ाण्याचे किशन शाहीर, उटीचे मधु मोरे यांच्यासह विविध कलापथकांतून त्यांनी जनतेचे प्रबोधन आणि मनोरंजन केले. सय्यद नूर, सय्यद मिरांजी, बंसी साबळे, वसंता पाटील, शेषराव राजिनकर, रविकिरण बनसोड, एम.जी. गायकवाड, अर्जून खंदारे आदी कलाकारांच्या साथीने १९७८-७९ मध्ये महागाव येथे ‘स्वर मिलन म्युझिकल नाईट ऑर्केस्ट्रा’ ची स्थापना करण्यात आली. बँजोपुरतेच त्यांचे कलाविश्व मर्यादित राहिले नाही. हार्मोनिअम, कॅशिओ, गिटार, तबला आणि ढोलकी अशा विविध वाद्यांवरही त्यांनी प्रभुत्व मिळविले. सिनेसृष्टीतील कलावंत रत्नप्रभा, कोल्हापुरे तसेच दूरदर्शनवरील कलावंत अशोक लोखंडे यांच्यासोबतही त्यांनी पार्श्वसंगीताचे काम केले.

बँजोच्या सुरांनी मिळवून दिली नोकरी

गणेशोत्सवाच्या काळात वसंत सहकारी साखर कारखाना येथे आयोजित ऑर्केस्ट्रामध्ये जयदेव भद्रे यांच्या अप्रतिम बँजोवादनाने तत्कालीन चेअरमन बाळासाहेब देशमुख सवनेकर प्रभावित झाले. त्यांच्या कलेची दखल घेत त्यांनी या नेत्रहीन कलावंताला टेलिफोन ऑपरेटर म्हणून कायमस्वरूपी नोकरी दिली. सन २०१२ मध्ये ते सेवेतून निवृत्त झाले. मात्र, नोकरीतून निवृत्ती घेतली म्हणून कलाकाराच्या बोटांनी सुरांपासून निवृत्ती घ्यावी, असे थोडेच! त्यांच्या बँजोचा मंजुळ प्रवास आजही अव्याहत सुरू आहे.

‘महाराष्ट्र रत्न’ आणि ‘मराठवाडा समाजरत्न’ने गौरव

दृष्टिहीनतेवर मात करून संगीत क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जयदेव भद्रे यांना ‘महाराष्ट्र रत्न’ तसेच ‘मराठवाडा समाजरत्न’ या राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यांच्या कलेचा हा सन्मान असला तरी, खऱ्या अर्थाने हा पुरस्कार त्यांच्या संघर्षाला, जिद्दीला आणि आयुष्यभर सुरू ठेवलेल्या संगीतसाधनेला आहे.

डोळ्यांचा प्रकाश हरपला; पण सुरांची दिव्य दृष्टी लाभली

देवीच्या आजाराने अवघ्या वयाच्या सहाव्या वर्षी नियतीने जयदेव भद्रे यांची दृष्टी हिरावून घेतली परंतू त्यांच्या जिद्दीने आणि साधनेने सुरांकडे पाहण्याची नजर त्यांना लाभली. यातूनच त्यांनी आपले कलाविश्व उभे केले. अंधाराला छेद देत बँजोच्या तारांतून प्रकाशाची भाषा बोलणाऱ्या या ‘बँजो मास्टर’च्या सुरेल जीवनप्रवासाला आज ७५ वर्षे पूर्ण झाली. अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त या अद्भुत कलावंताला मनःपूर्वक सलाम!

Related posts

४८ तासानंतरही पोलीसांना आरोपी सापडेना 

दलित शेतकरी कुटुंबाला भूमिहीन करून फसवणूक

सवना येथील जि. प. कन्या शाळा रामभरोसे

Chief Editor Gajanan waghmare

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

पोलीस शिपाई पदावर निवड झालेल्या तरुणांचा व पालकांचा सत्कार

वीजप्रवाहाच्या धक्क्याने २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Leave a Comment