वडद शिवारातील घटना
साप्ताहिक लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस
महागाव तालुक्यातील वडद (मुुडाणा) येथील २२ वर्षीय तरुणाचा विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. १६) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास वडद शेतशिवारात घडली. कृष्णा रमेश गोदमले (वय २२, रा. वडद, ता. महागाव, जि. यवतमाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कृष्णा गोदमले हा शेळ्यांसाठी पाला आणण्यासाठी शेतशिवारात गेला होता. त्यावेळी त्याला विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, विद्युत प्रवाहाचा धक्का नेमका कोणत्या परिस्थितीत आणि कशामुळे लागला, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झाली नाही. घटनेच्या वेळी कृष्णासोबत अन्य तीन मित्र असल्याचेही सांगण्यात येते. घटना घडल्यानंतर त्यांनी गावात येऊन घटनेची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पंचनामा करण्यात आला. आज सकाळी कृष्णाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सवना ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

