लोकचिंतन

डोंगरगाव येथील घटना

शेतकऱ्याचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान

लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस

महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथे घराच्या आवारातील बाथरूममध्ये ठेवलेला अंदाजे एक क्विंटल कापूस अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना २ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. या कापसाची किंमत सुमारे १० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी सैयद जमील सैयद हकीम यांच्या तक्रारीवरून पोफाळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. डोंगरगाव येथील सैयद मुसवीर सैयद जमील यांनी सुनील माणिकराव कदम यांची अडीच एकर शेती मक्त्याने घेतली आहे. या शेतात हळद, सोयाबीन, कापूस आणि तूर अशी पिके घेण्यात आली होती. शेतातून वेचलेला कापूस घराच्या आवारातील बाथरूममध्ये ठेवण्यात आला होता. सध्या शेतीची देखभाल सैयद मुसवीर यांचे वडील सैयद जमील सैयद हकीम करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. १ नोव्हेंबर रोजी रात्री कुटुंबीय जेवण करून झोपले होते. २ नोव्हेंबरच्या पहाटे पाचच्या सुमारास काळ्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पँट घातलेली व्यक्ती घराच्या भिंतीवरून उडी मारून बाहेर जाताना दिसल्याचे सैयद मोहसीन यांनी सांगितले. त्यानंतर घराच्या आवाराची पाहणी केली असता बाथरूममध्ये ठेवलेला कापूस गायब असल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोफाळी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोफाळीचे ठाणेदार निलेश शेंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार दादाराव चिल्लोहरकर तपास करीत आहेत.

सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांची तपासणी शक्य

चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील उपलब्ध पुरावे तसेच इतर तांत्रिक बाबींची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. चोरीला गेलेला कापूस आणि संशयित व्यक्तीचा शोध घेण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. कापूस हंगाम सुरू असताना घराच्या आवारात ठेवलेल्या शेतीमालाची चोरी झाल्याने शेतमालाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उत्पादन खर्च, बाजारभाव आणि हवामानाच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी शेतीमालाचे संरक्षणही महत्त्वाचे ठरत आहे.

अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल

सैयद जमील सैयद हकीम यांच्या तक्रारीवरून पोफाळी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०५ व ३३१(४) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोफाळी पोलीस करीत आहेत. कापूस चोरीची माहिती मिळाल्यानंतर पोफाळीचे ठाणेदार निलेश शेंबडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासाच्या दृष्टीने आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, बीट जमादार दादाराव चिल्लोहरकर यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे.

Related posts

थार वाहनाच्या मालकीवरून महागावात धुमश्चक्री

Chief Editor Gajanan waghmare

महागाव तालुक्यात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत 

Chief Editor Gajanan waghmare

मतदार यादी पुनर्निरीक्षणासाठी बीएलओ कॅम्प

शेणंद गावात ७० टक्के नागरिकांना अज्ञात तापा चा विळखा

Chief Editor Gajanan waghmare

कोनदरी तलावात उडी घेऊन सेवानिवृत्त पोस्टमनची आत्महत्या

मृत खातेदार ‘जिवंत’ दाखवून बँकेतून ३२ हजराचा विड्रॉल ? 

Leave a Comment