लोकचिंतन

पत्रकार सय्यद मुदस्सीर यांच्या एक वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

 

आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे निष्पाप कळी उमलण्याआधीच कोमेजली

लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस

खेळण्या-बागडण्याच्या अन् हसण्या-रुसण्याच्या अवघ्या एका वर्षाच्या वयातच काळाने घाला घातला. महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथील निष्पाप चिमुकली सिझा फातेमा सय्यद हिचा निमोनियासारख्या आजाराने दि. २२ सप्टेंबर रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुदस्सीर यांच्या काळजाचा तुकडा असलेली सिझा अचानक कायमची सोडून गेल्याने सय्यद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नेहमी इतरांच्या हक्कासाठी, गावातील समस्यांसाठी आपला आवाज उठवणारे पत्रकार सय्यद मुदस्सीर यांच्यावर स्वतःच्याच पोटच्या गोळ्याला गमावण्याची वेळ यावी, यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते? या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे “आमची सिझा प्रशासकीय अनास्थेची बळी ठरली का?” असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

अस्वच्छता अन् डासांचा वेढा; चिमुकलीने गमावला श्वास

डोंगरगावात गेल्या अनेक दिवसांपासून साचलेले पाणी, घाणीचे साम्राज्य आणि डासांचा प्रचंड प्रादुर्भाव आहे. अस्वच्छतेमुळे आजारांचा फैलाव वेगाने होत असतानाही आरोग्य विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. गावातील वाढती अस्वच्छता आणि डासांमुळेच चिमुकल्या सिझाला निमोनियाची लागण झाली अन् तिची प्राणज्योत मालवली. जर वेळेत स्वच्छता झाली असती, तर आज सिझा आपल्या आई-वडिलांच्या कुशीत हसत-खेळत असती, अशा भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

गावात फॉगिंग अन् औषध फवारणी कागदावरच?

आरोग्य विभागाची निष्काळजीपणाची सवय आणखी किती निष्पाप बालकांचे बळी घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गावात डासांचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाही फॉगिंग मशिन चालवणे, औषध फवारणी करणे किंवा साचलेल्या पाण्याचा निचरा करणे या प्राथमिक बाबींकडे लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले. प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळेत न झाल्यामुळेच आज एका बापाचे छत्र आणि आईची कुस उजाड झाली आहे.

 

डोंगरगाव अजूनही आरोग्य उपकेंद्रापासून वंचित!

तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या डोंगरगावची शोकांतिका अशी की, येथे आजही स्वतंत्र आरोग्य उपकेंद्र नाही. ऐन आणीबाणीच्या वेळी चिमुकल्या जीवांना उपचारासाठी मैलो न मैल दूर धाव घ्यावी लागते. “हक्काचे उपकेंद्र असते, तर कदाचित आमच्या सिझाला प्राथमिक उपचार वेळेत मिळाले असते,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. डोंगरगावला तातडीने आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

“माझी सिझा गेली, पण इतर कुणाचे लेकरू जाऊ नये!” – वडिलांची आर्त हाक

आपल्या पोटच्या गोळ्याच्या विरहाने खचलेल्या सय्यद मुदस्सीर यांनी अत्यंत जड अंतःकरणाने प्रशासनाला आर्त साद घातली आहे. “माझ्या काळजाचा तुकडा तर निघून गेला, पण शासनाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी. ग्रामीण भागातील आरोग्याची अवस्था सुधारावी आणि निष्पाप बालकांच्या मृत्यूंची निष्पक्ष चौकशी व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे. गावात त्वरित आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून, धूर फवारणी व स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर राबवावी आणि कायमस्वरूपी आरोग्य उपकेंद्र सुरू करावे, अशी मागणी डोंगरगावचे नागरिक करत आहेत.

प्रशासनाच्या बंद डोळ्यांना सिझाचा बळी दिसेल का?

  • अवघ्या एका वर्षाची सिझा फातेमा सय्यद हिचा झालेला मृत्यू केवळ एका कुटुंबाचा शोक नाही, तर संपूर्ण डोंगरगावच्या छातीत सळसळणारी वेदना आहे. डासांचा वेढा, आरोग्याची दुरवस्था अन् प्रशासकीय अनास्था या सर्वांनी मिळून एका निष्पाप कळीचा श्वास हिरावून घेतला. ही घटना घडल्यावर तरी निद्रिस्त झालेली आरोग्य यंत्रणा जागी होणार का? की आणखी एखाद्या चिमुकल्याच्या बळीची वाट पाहणार? हा यक्षप्रश्न आज डोंगरगावातील प्रत्येक नागरिक विचारत आहे.

Related posts

गोवंश तस्करांचा रक्तरंजीत धुमाकूळ

Chief Editor Gajanan waghmare

देशी दारू दुकानावरून स्थानिक नगरसेविकेचे मौन संशयास्पद

टोल नाक्यावर सहायक पोलीस निरीक्षकाची संपादकासोबत दादागिरी

४८ तासानंतरही पोलीसांना आरोपी सापडेना 

यवतमाळ जिल्ह्यात नवीन विहीर-बोअरवेल खोदण्यावर निर्बंध

Chief Editor Gajanan waghmare

पंचायत समितीच्या आवारात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Comment